पुणे: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून बहुतांश लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले असून दुसरीकडे जिल्हा प्रशासन देखील निवडणुकीची तयारीत गुंतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे काम पाहत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीचे काम सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील विविध विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कुटुंबातील दुखणे बाहेर काढले, तर कोणी स्वतःच उपचार घेत असल्याचे कारण दाखवून अर्ज केले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना दिलेला आदेश रद्द करण्याची वेळ आली आहे.
निवडणूक कामकाज आढाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांच्या कामांसाठी नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, बँका तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध कार्यालयांमधील कर्मचारी नियुक्त केले आहेत. कर्मचार्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले. दुसरे प्रशिक्षण लवकरच देण्यात येईल. अनुपस्थित कर्मचार्यांना नोटिसा पाठविण्याची कारवाई करणार आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय विभागांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांना खरोखरीच आरोग्यविषयक त्रास, शारीरिक व्याधी किंवा पूर्वनियोजित कामासाठी बाहेरगावी किंवा परदेशात जायचे असल्यास अशा कर्मचार्यांची शहानिशा करून त्यांना वगळण्यात येईल. आतापर्यंत कोणत्याही कर्मचार्याला निवडणूक कामकाजातून वगळण्यात आल्याचे आदेश काढण्यात आलेले नाहीत किंवा संबंधित कर्मचार्यांना तसे सांगण्यात आलेले नाही, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले.