भोर: लोकसभा निवडणूकीत बारामती मतदार संघाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गटावर दोन्ही गट एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आईच्या प्रचारात उतरलेले आहेत, त्यांनी पहिल्यांदाच थेट सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली असून ''संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही' असे म्हंटले आहे.
जय पवार म्हणाले, “आज त्या म्हणत आहेत की मला संसदरत्न मिळाला आहे. मात्र भोर तालुक्याला काय मिळालं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संसदरत्न पुरस्कार हा मोठा पुरस्कार नाही. सरकारचा पुरस्कार नाही तो पुरस्कार एका एनजीओच्या माध्यमातून दिला जातो. अशी जोरदार टीका जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी अशी टीका केली आहे.
जय पवार यांनी रॅली काढत असताना हा प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही अनेक वर्षापासून सुप्रिया ताईंना निवडून देत आहात. मात्र जशी काम व्हायला हवी होती तशी काम झाली नाहीत असे देखील जय पवार म्हणाले. आता या टीकेला सुप्रिया सुळे काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.