पुणे: सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. त्यातच उमेदवारही गावोगावी, घरोदारी जात लोकांना मते मागत आहेत. आपले विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, भाजप यांनी आपापले जाहीरनामे प्रकाशित केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने देखील आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीरनामा वाचून दाखवला. हा जाहीरनामा राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारीत असल्याचं तसेच आरोग्य, शिक्षण, स्वस्छात आणि पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ग्रामविकासाची पंचसुत्री असल्याचं अजित पवार म्हणाले.
मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी जाहीरनामा वाचून दाखवला. ते म्हणाले, दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती नेमली आहे. त्या समितीने अहोरात्र मेहनत करून जाहीरनामा प्रसिध्द केला. अठरा पगड जातींचा विचार करणार आणि सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणारा हा जाहीरनामा आहे. या मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
नेतृत्व, वक्तृत्व , उत्तम प्रशासक म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मानसन्मान वाढवला आहे. याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा ‘मंगलकलश‘ यशवंतरावाच्याच प्रयत्नांनी आणला गेला. देशाचे गृहमंत्री, उपपंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द दैदिप्यमान आहेच. अशा व्यक्तिमत्त्वाचा यथोचित सन्मान हा केवळ ‘भारतरत्न’ देऊनच होऊ शकतो.
जाहीरनाम्यातील महत्वाच्या घोषणा
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार
- यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार देणार
- शेतकऱ्यांना एमएसपी देण्यासाठी प्रयत्न
- अपारंपारिक वीज निर्मिती करणार
- शेतकरी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ करणार
- शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ करणार
- जातनिहाय जातगणना
- उर्दू शाळांना सेमी इंग्लिशचा दर्जा
- वक्षेत्रात पाण्याचे साठे तयार व्हावे यासाठी योजना