पुणे (प्रतिनिधी) ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीही चुरस असते. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मी काय किंवा मुरलीधरआण्णा काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असतो. त्याच्या विजयासाठीच सर्वजण प्रयत्न करतो. यावेळीही माझ्यासह आपण सर्वांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी पुढील सर्व दिवस कार्यरत राहू’, असे आवाहन माजी आमदार आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरीतील मेळाव्यात केले.
वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बापूसाहेब पठारे, शिरूर पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जासुद, हवेली बाजार समितीचे माजी उपसभापती राजेद्र कंद, हवेली बाजार समितीचे संचालक नानासाहेब आबनावे, भाजपाचे तालुका अध्य़क्ष आबासाहेब सोनावणे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचरणे, भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सोनावणे, नगरसेवक राहुल भंडारे, सचिन पलांडे, रोहित खैरे, केशव पाचरणे, संतोष भरणे, सचिन सातपुते, अनिल नवले यांच्यासह श्रीगोंदा-पारनेर-हवेली तालुक्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात रहायला असलेले नागरीक, तरूण मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.
जगदीश मुळीक म्हणाले, ‘ही निवडणूक देशासाठी फार महत्वाची आहे. कारण आपण सन २००४ ते २०१४ काँग्रेस-युपीएचे सरकार आणि २०१४ ते २०२४ भाजपचे एनडीएचे सरकार देशात बघितले आहे, अनुभवले आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशात विकासाची कामे केली. पण कोणीही विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. या उलट सर्वसामान्य व्यक्तींशी सहजपणे संवाद साधणारा पंतप्रधान देशवासीयांनी प्रथमच बघितला. काय करणार यापेक्षा काय केलं, हे सांगणारे सरकार मोदी यांनी दिले असल्यानेच त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशवासी उत्सुक आहेत. त्यात आपण वडगावशेरीतील सर्वांनी आपला वाटा उचलूयात आणि कमळ फुलवत मुरलीधर मोहोळ यांनी प्रचंड मताधिक्याने दिल्लीत पाठवू या’.
आमदार सुनील टिंगरे म्हणाले, ‘वडगाव शेरी आणि नगर रोड परिसरातील नागरीकांसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा करणार, असे आम्ही ऐकत होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयाला चालना दिली. एक गोष्ट सांगितलीच पाहिजे की महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ हेसुद्धा यासाठी किती आग्रही होते, हे मी बघितले आहे. जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणारा एक चांगला उमेदवार आपल्याला त्यांच्या रूपाने मिळालेला आहे. ते निवडून येतीलच, पण आता त्यांनाजास्त मताधिक्य देणे ही माझ्यासह आपली सर्वांची जबाबदारी आहे.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, मी एक कार्यकर्ता आहे. आमच्यासाठी देश सर्वप्रथम, नंतर पक्ष असतो. पुण्यात विकासाला मोठा निधी मिळू शकतो आणि पुण्याचा महापौर म्हणून काम करताना विकासाची सर्वाधिक संधी ही वडगावशेरी मतदार संघात आहे. असे माझे मत आहे. त्यामुळे या परिसरात मेट्रोचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यासाठीच्या पायभूत सुविधा विकसित करण्यासाठी माझे प्राधान्य असेल. आपले यावेळचे एक बहुमोल मत हे भाजपला नाही तर आपले एक मत हे राष्ट्रासाठी द्यावयाचे आहे. त्यामुळे आपण सर्वानीच जास्तीतजास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा संकल्प आज करूयात. मेळाव्यात सर्वच मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.