पुणे: पुणे लोकसभा मतदार संघातील प्रचाराची रणधुमाळी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. एकीकडे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजपसह एकदिलाने एकवटलेले महायुतीतील सर्व घटक पक्ष, मोहोळ यांच्या पदयात्रांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद असे चित्र असताना दुसरीकडे कॉँग्रेस पक्षांतर्गत वाद मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची पाठ सोडायला तयार नाही. रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात पत्रकार धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉँग्रेस भवन येथे आले असताना त्यांच्या समोरच कॉँग्रेसचे माजी गटनेतेआबा बागूल यांच्या विरोधात बॅनर्स झळकावून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राजकीय वर्तुळात या सर्व प्रकाराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले आबा बागूल यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला जाऊन भेट घेतली होती. या घटनेनंतर बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. ‘नाराजांकडे जाणे, त्यांच्याशी बोलणे हे आमचे काम आहे.’ बागूल यांचीही नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे.’ असे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे दोन पदाधिकारी काँग्रेसभवनमध्ये बॅनर्स घेऊन आले. त्यांनी माजी नगरसेवक आबा बागुल यांच्या हकालपट्टीची मागणी करत काँग्रेस भवनाबाहेर पोस्टर झळकवले.'नागपूर येथे भाजप नेत्यांची भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध,' अशा आशयाचे फलक झळकावले. तसेच, 'गद्दार बघाओ, काँग्रेस बचाओ'चा नारा देखील देण्यात आला.
रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पक्षांतर्गत आणि आघाडी अंतर्गत नाराजीने ग्रासले आहे. काँग्रेसच्या एका मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देण्यावरून झालेला वाद, त्यानंतर नेत्याचा फोटो बॅनरवरती लावला नसल्याच्या कारणावरून थेट मंडपवाल्यालाच मारहाण झाल्याचा प्रकार, काँग्रेस ओबीसी सेलच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून झालेला वाद, आबा बागुलांची नाराजी आणि आता पक्षाचे जेष्ठ नेत्यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्याच दोन पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर फलक झळकवत आबा बागुल यांची हकालपट्टीची केलेली मागणी यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामागचा पक्षांतर्गत कुरघोडीचा ससेमिरा पाठ सोडायला तयार नाही.