काँग्रेसच्या निष्ठावान आबा बागुलांनी फडणवीसांची भेट घेण्यासाठी थेट गाठलं नागपूर

Pune-Loksabha-Election-Aba-Bagul-and-Devendra-Fadanvis-Meeting

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना एका मागून एक,धक्के बसत आहेत. लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून इच्छुक असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी थेट नागपूर गाठल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.


काँग्रेस पक्षाशी गेली अनेक वर्षे एकनिष्ठ राहण्याचे काम केले. कधीही पक्षाच्या विरोधात भुमिका घेतली नाही. पक्ष विरोधात काम केले नाही, याचे फळ म्हणून अनेकदा काँग्रेसकडून आपल्याला डावलण्यात आले,असा आरोप बागुल यांच्याकडून केला जात होता. 35 ते 40 वर्षे सक्रीय राजकारणात सात ते आठ वर्षे काँग्रेसकडून पदे देण्यात आली. ज्यांनी 20 वर्षे काँग्रेसमध्ये काम केले, त्यांच्याकडे 16 ते 17 वर्षे पदे आहेत. इतर पक्षातून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना तर पायघड्या घातल्या गेल्या. पक्षाचे वर्षानुवर्षे एकनिष्ठेने काम करणाऱ्यांना पदे देताना हात आखडता घेतला जातो. मात्र इतरांना आमदार, खासदारकीची उमेदवारी दिली जाते, अशी सल देखील बागुल यांनी बोलून दाखविली होती. 


सुरुवातीपासून नाराज असलेले आबा बागुल यांनी आपली नाराजी काँग्रेस भवन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मुख्य निदर्शने करून दर्शवली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षांतर्गत बैठकांना आबा बागुल यांनी दांडी मारली होती. आता आबा बागुल यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूर गाठल्याचे वृत्त आहे. आबा बागुल हे काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्यांचे पर्वती मतदारसंघात चांगले काम आहे.त्यांना मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे. आबा बागुलांनी त्यांच्या प्रभागामध्ये अनेक उपक्रम राबवलेले आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठांना काशी यात्रा आणि नवरात्र महोत्सव यामुळे त्यांचा नावलौकिक पर्वती विधानसभा मतदारसंघात मोठा आहे.


पर्वती मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ तसेच भाजपचे माजी सभागृह नेते आणि भाजपचे लोकसभा निवडणूक समन्वयक श्रीनाथ भीमाले यांचीही ताकद मोठी आहे. आता त्याला जोड आबा बागुलांची मिळाली तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर यांची ताकद पर्वती मतदार संघात वाढून मोहोळ यांच्या मताधिक्क्यात आणखी वाढ आहे होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.