डिजिटल इंडियात परंपरेची कास धरत, मोदींच्या सभेसाठी दवंडी देऊन पुणेकरांना आवतण

 

Pune-Loksabha-Election-Davandi-For-Narendra-Modi-Sabha

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात जोरदार प्रचार सभा होत आहेत. याच अनुषंगाने उद्या पुण्यात नरेंद्र मोदी यांची राज्यातील महायुतीकडून जाहीर  सभा आयोजित करण्यात आलीय. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आता पुण्यात पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन आमंत्रण दिलं जात आहे. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा आहे. 



पुण्यातील लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक सभा होत आहे. या सभेला बारामती, मावळ, शिरूर सह पुणे लोकसभा मतदारसंघातील लोकांची गर्दी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काल भाजपचे युवा नेते गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पारंपारिक दवंडीद्वारे पुणेकरांना निमंत्रण देण्यात आले. 

या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, दवंडी म्हणजे एक पारंपरिक निमंत्रण पद्धती! पूर्वी दवंडी शिवाय कुठल्याही कार्यक्रमाचे निमंत्रण अपूर्णच असायचे. काळानुसार दवंडीची प्रथा हद्दपार होऊन त्याची जागा आता अद्ययावत तंत्रज्ञानाने घेतली आहे. त्यामुळे गटातील दवंडीचा आवाज हल्ली ऐकायला मिळत, नाही. मात्र देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या पुण्यनगरी येथे होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेसाठी पुण्यातील गिरीश खत्री मित्र परिवाराच्या माध्यमातून पारंपरिक दवंडी पद्धतीने सभेचे निमंत्रण दिले जात आहे. काळानुसार लुप्त होत गेलेली दुर्मिळ दवंडी पद्धती पाहून वेगळाच आनंद झाला. 


 गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्य नगरीचे ग्राम दैवत श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिर, तांबडी जोगेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, ताथवडे उद्यान अश्या शहरातील विविध भागात दवंडीद्वारे पारंपरिक पद्धतीने निमंत्रण देण्यात आले. याशिवाय शहरातील विविध भागात, विविध मंदिरे, सामाजिक - ऐतिहासिक ठिकाणी आणि कलाकार कट्टा इत्यादी मोक्याच्या ठिकाणी दवंडी देत पुणेकरांना जास्तीत जास्त संख्येने मोदींच्या सभेला उपस्थित राहावे म्हणून निमंत्रित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.