मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून मोहोळ यांचे स्वागत

 

Pune-Loksabha-Election-Murlidhar-Mohal-Vs-Ravindra-Dhangekar


पुणे: पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची अधीसूचना जारी होत असतानाच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी यांनी सहाही मतदारसंघात पदयात्रा करून उमेदवारी अर्ज दाखल कऱण्यापूर्वीच प्रचाराचा धुराळा उडवला आहे. यातून महायुतीची असलेली वज्रमूठ मतदारांना बघायला मिळाली. शहरातील मान्यवरांच्या तसेच प्रभावशाली व्यक्ती, पक्षाचे जुने कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन भेटीगाठी, विविध संस्था संघटनांच्या मेळाव्यांना उपस्थिती आणि त्यानंतर सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधण्यासाठी दाटलोकवस्तीच्या परिसरात पदयात्रा करत मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे.


शहरातील कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील दाट लोकवस्तीच्या परिसरात या मतदार संवाद पदयात्रा काढण्यात आल्या होत्या. या पदयात्रांमध्ये भाजपसह महायुतीतील सर्व पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले होते. यातून उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी थेट नागरीकांशी संपर्क साधला आणि श्री मोदीजींना मतदान करण्याचे आवाहन केले. विविध समाजघटकांनी मोहोळ यांचे केलेले स्वागतही चर्चेचा विषय ठरले. कार्यकर्त्यांच्या घोषणा, झेंडे, यामुळे निवडणुकीच्या वातावरणात रंग भरायला सुरूवात झाली आहे.


यात सर्व मतदार संवाद पदयात्रांमध्ये महायुतीतील पक्षाचे शहराध्यक्षांसह धीरज घाटे, आमदार, खासदार, माजी नगरसेवक, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत होते. हा तंत्रज्ञानाचा जमाना असल्याने बहुतेक सर्व पदयात्रांचे व्हिडिओ कार्यकर्ते स्वत:हून काढून ते व्हायरल करत होते. त्यामुळे आपल्या भागात पदयात्रा किंवा प्रचार फेरी कधी असणार याबद्दल कार्यकर्त्यांकडे विचारणा होऊ लागली आहे. या पदयात्रेच्या काळात शहराच्या विविध भागातील विविध समाज घटकातील मतदारांचा मूड लक्षात येत होता.


पदयात्रांची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर मोहोळ म्हणाले, ‘सहाही विधानसभा मतदारसंघात पुणेकरांचा मिळालेला प्रतिसाद मलाही भारावून टाकणारा होता. ठिकठिकाणी झालेले उत्स्फूर्त स्वागत हे भारतीय जनता पार्टी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाचे प्रतीक आहे, अशी माझी भावना आहे. विशेष म्हणजे मोदीजींची समाजाच्या सर्व घटकांत असलेल्या विश्वासाची पावतीही पदोपदी मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही पदयात्रेत महायुती म्हणून पुणेकरांसमोर गेल्याने महायुतीतील प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधित्व यात पाहायला मिळाले’

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.