पुणे: महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आज पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन करीत पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री उदय सामंत, तसेच महायुतीचे सर्वच नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी मुरलीधर मोहोळांनी मोठं विधान केलं आहे. “पुणेकर कर्ज स्वरुपात मला मतदान करतील. मी त्यांचे हे कर्ज हे कामाच्या स्वरुपातून व्याजासहीत परत करणार”, अशी ग्वाही मोहोळांनी यावेळी दिली. तत्पूर्वी त्यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी ते प्रसार मध्यमांशी बोलत होते.
मोहोळ म्हणाले, “देशातील सर्वोत्तम शहर पुण्याला बनवण्याची संधी मला मिळत आहे. याचं मला समाधान आहे. मताधिक्य मिळणं किंवा निवडणूक जिंकणं यापेक्षा महत्वाचं आहे की, त्यानंतर मिळालेल्या जबाबदारीचं भान आतापासून आहे. प्रत्येक पुणेकर मतदारांची काहीतरी अपेक्षा आहे. आज पुणेकर कर्ज स्वरुपात मला मतदान करतील. मी त्यांच्या अपेक्षा, कर्ज हे कामाच्या स्वरुपातून व्याजासहीत परत करणार“, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी नगरसेवक असताना ज्या त्या प्रभागात चांगली कामे केली आहेत. पण ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे पुणेकर मोठा विचार करणार आहेत. देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाला पाठवायचं आणि आपला माणूस कोण याचा विचार करणारे आहेत. देशाचे प्रतिनिधित्व हे मोदीजीच करणार आहेत आणि पुणेकर निश्चितच महायुतीचा उमेदवार निवडून देतील”, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.