बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून 16 एकर जागेतील सात मजली इमारतीत 500 खाटांचे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज विस्तारीत रुग्णालयाचे काम नजिकच्या काळात पूर्ण होईल. त्यामुळे पर्वती, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे मत भाजप महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीत सुरू करता आले याचा विशेष आनंद वाटतो. या महाविद्यालयामुळे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि रुग्णांना किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. कोरोना काळात शहराच्या आरोग्य यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यात आला.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील आंबेडकर नगर, आदिनाथ सोसायटी, प्रेमनगर, गंगाधाम, मार्केट यार्ड बस डेपो, महेश सोसायटी, चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर आदी परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, समन्वयक श्रीनाथ भिमाले, दीपक मिसाळ, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, रुपाली धाडवे, वर्षा साठे, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रविण चोरबोले, अनुसया चव्हाण, प्रशांत दिवेकर, शिवसेना नेते सुधीर कुरूमकर, नितीन लगस, श्रीकांत पुजारी, अविनाश खेडेकर, राष्ट्रवादीचे संतोष नांगरे, श्वेता होनराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहोळ म्हणाले, 'ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारू अशी घोषणा काँग्रेसकडून अनेक वर्षे केली गेली. पण ती कधीही प्रत्यक्षात आली नाही. आमदार माधुरी मिसाळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने केंद्र शासन हे रुग्णालय उभारत आहे. नव्या प्रशस्त रुग्णालयात अतिदक्षता विभाग, बाह्यरूग्ण कक्ष, सुपर स्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, साधारण व अतिदक्षता विभागाचे कक्ष असतील. रेडिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळांचा समावेश असेल. पुढील दोन वर्षांत बांधकाम पूर्ण होईल.