पुणे: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी काल पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील आणि महायुतीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटातील महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या की, पुणे लोकसभेच्या बाबतीत मुरलीधर मोहोळ यांनी आपला काल उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी प्रचंड गर्दी दिसून आली. या गर्दीवरूनच लक्षात येते कीत पुणेकर किती उत्साही आहेत. फारसा पुणेकर कुणाला डोक्यावर घेत नाही. परंतु काल मुरलीधर मोहोळ यांनी जे काही काम केलं आहे. त्या कामाची उतराई म्हणून खऱ्या अर्थाने इतक्या उन्हामध्ये सुद्धा पुणेकर रस्त्यावर उतरलेला होता. त्यामुळे पुण्याची निवडणूक ही पुणेकरांनी आता हातात घेतली आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरणे ही औपचारिकता असून मुरलीधर मोहोळ यांनी केलेली विकासकामांमुळे पुणेकरांनी कालच निकाल दाखवून दिला आहे.
दरम्यान, त्याआधी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पुण्याच्या पुढील ५० वर्षाचा विचार करून शहरात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने कामे सुरू केली आहेत. पुणे देशातील प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे. नागरिकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी पुढील काळात पुणे शहर आणि परिसरात ५० हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. शिक्षणाच्या आणखी चांगल्या संधी निर्माण होणे, नवीन उद्योग आणणे, रोजगारनिर्मिती करणे, पायाभुत सुविधा निर्माण करणे यासाठी ही निवडणुक लढवत असून पुणेकर मला नक्की विजयी करतील असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.