पुणे: पुणे लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. त्यात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही तगडे नेते मानले जात आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. तिघांच्या प्रचारासाठी महत्वाचे नेते मैदानात उतरणार आहे. त्यातच आता महाविकास आघाडीकडून प्रचाराचे नियोजन करण्यात आलं आहे. प्रचारासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे रोड शो होणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती रवींद्र धंगेकरांनी दिला आहे.
काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी पदयात्रा आणि जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पदयात्रेदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, आपल्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी येणार असल्याचं धंगेकरांनी सांगितलं.
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलं आणि विजय खेचून आणला. त्यावेळी हू ईज धंगेकर म्हणून त्यांना हिणवलं गेलं मात्र तेच धंगेकर विजयी झाले. यावेळी धंगेकरांना शिक्षणावरुन ट्रोल केलं जात आहे. विरोधकांकडून खासदार आठवी पास म्हणून त्यांना हिणवलं जात आहे.त्यातच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सभा आणि रॉड शो मुळे काँग्रेसपासून दूर गेलेला मतदार पुन्हा काँग्रेस कडे वाळण्यास फायदा होणार आहे. त्याच प्रमाणे काँग्रेस मधील मरगळ बाजूला होऊन नवं चैतन्य येईल कॉंग्रेसमध्ये असलेले 'नाराजी नाट्य' देखील दूर होण्यास मदत होणार आहे अशी चर्चादेखील काही ठिकाणी रंगताना दिसत आहे.