पुणे : "बारामती मतदारसंघाने विकासाचे काम पाहिले आहे. त्यामुळे मी जिथेही जाते तेथे लोकांचा जोश पाहून कळते आहे की, माझी उमेदवारी ही जनतेची मागणी आहे. माझ्यासाठी ही परिस्थिती खूपच सकारात्मक आहे.", या शब्दात बारामती मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपल्या विजयाचा आशावाद व्यक्त केला.
लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर असून सगळ्या राजकीय पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूकीकडे तर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. येथील महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुनेत्रा पवार या आज पुण्यात प्रचारासाठी आल्या होत्या. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या विजयाचा आशावाद व्यक्त केला.
पुढे बोलताना सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) म्हणाल्या, मी जिथेही जाते तेथे लोक प्रेमाने स्वागत करतात, त्या लोकांचा जोश पाहून कळते आहे की माझी उमेदवारी ही जनतेची मागणी आहे. अनेकांनी बारामती तालुक्यातील विकास पाहिला आहे. पण त्या तुलनेत इतर तालुक्यांचा विकास झालेला नाही. बारामतील टेक्स्टाइल पार्क आहे, महिलांना मोठ्या संख्याने रोजगार मिळाला आहे, कारखान्यांमुळे इतर नागरिकांना देखील रोजगार मिळाला आहे. थोडक्यात 'बारामती पॅटर्न' इतर तालुक्यात देखील राबवण्याचा आमचा मानस आहे.
अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला तो योग्य आहे, असे सांगत पुढे त्या म्हणाल्या, केंद्राच्या योजना तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकाच विचारांचे सरकार आवश्यक आहे. असे असेल तरच नागरिकांचे जनकल्यानाचे प्रश्न सुटतील.