सोलापूर: राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील नेते सध्या पक्षांतर करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. एका पक्षातील नाराज नेते दुसऱ्या पक्षात तर दुसऱ्या पक्षातील नाराज नेते तिसऱ्या पक्षात असेच काहीचे राजकारण सध्या सुरू आहे. यातच आता मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
संजय क्षीरसागर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. आपल्याला उमेदवारी दिली नसल्याचे दुःख नाही. मात्र, 2006 पासून मला पक्ष योग्य वागणूक देण्यात येत नसल्याचा आरोप संजय शिरसागर यांनी केला आहे. 2014 च्या पराभवानंतर पक्षाची इच्छा असताना देखील पक्षातीलच काही नेत्यांच्या दबावामुळे माझ्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. इतकेच नाही तर आपण शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणती शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचे देखील संजय क्षीरसागर यांनी जाहीर केले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते सामना होत आहे. त्यात आता संजय क्षीरसागर यांच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांची ताकद या निमित्ताने नक्कीच वाढणार आहे. तर दुसरीकडे माझी लढाई ही माजी मुख्यमंत्र्यांची कन्या विरुद्ध ऊसतोड कामगारांचा मुलगा अशी असल्याचा प्रचार राम सातपुते हे करत आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत चांगलीच रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.