राज्यात ३ ते ४ दिवसात उष्णतेची लाट; गुजरातमधून महाराष्ट्रात येणार उष्ण हवा


 गेल्या आठवडाभरापासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. रविवारी महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान ४० अंश सेल्सिअस ओलांडले. सोलापूर येथे तापमान २.३ अंशांनी वाढून ४३.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात उच्च तापमानाची नोंद झाली आहे. अशातच राज्यात येत्या तीन ते चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यांतील काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. असह्य करणारा उन्हाचा चटका उष्माघात ठरू शकतो. त्यामुळे काम असेल तर घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

सध्या हवामानात मोठे बदल होत असून गुजरातमधून येणारी उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कमी पाऊस, कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणाम यामुळे कमाल तापमान वाढत आहे. अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच घामाघूम होत आहे. उकाड्यामुळे घशाला सारखी कोरड पडत आहे. 

त्यातच वातावरणातील खालच्या थरातील द्रोणिका रेषा आज पूर्व विदर्भापासून उत्तर केरळपर्यंत, मध्य महाराष्ट्र कर्नाटकावरून जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत कोकण- गोव्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

उष्माघाताची लक्षणं

चक्कर येणं, उल्ट्या होणं, मळमळ होणं.

शरीराचं तापमान जास्त वाढणं.

पोटात कळ येणं.

शरीरातील पाणी कमी होणं.

ही लक्षणं आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महानगरपालिकेनेही काही सूचना केल्या आहेत.


उष्मघातावर प्रथमोपचार 

तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.

ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.

त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.

एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.

त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या.

त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.