बारामती : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तिसऱ्या टप्यात असलेल्या ११ लोकसभा मतदारसंघांचा प्रचार रविवारी थंडावला. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटची प्रचार सभा घेतली, यावेळी तूफान फटकेबाजी करत ”बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकासर करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना विजयी करा,” असे आवाहन केले आणि भावनिक न होता विकासाच्या मुट्धावर मतदान करा, राज्याच्या निधीला केंद्राची जोड मिळाल्यास विकासाला गती येईल, हा विचार नजरेसमोर ठेवून निर्णय घ्या, असेही त्यांनी सांगितले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीमधील मिशन ग्राउंडवर महायुतीची सांगता सभा झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, एकमेकांत भांडून उपयोग होणार नाही, बारामतीचा विकास होत नाही, हे लक्षात आल्याने सर्व विरोधक एकत्र आलो आहोत. बारामती, इंदापूर, पुरंदरसह लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार आहोत, तसेच बारामती परिसरातील जिराईत शब्दाचे रूपांतर बागायती शब्दात करण्याचा आमचा निर्धार आहे. बामरामती लोकसभा मतदारसंघातील शेती, पाणी, रेल्वे, विमानतळ, मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याचा शब्द मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले.
आपल्यावर टीका करणाऱ्यांना पळता भुई थोडी होईल असे सांगत अजित पवार म्हणाले, “फार उड्या मारू नका, निवडणूक औटघटकेचीच आहे. निवडणूक झाल्यावर यातला एकही जण येथे दिसणार नाही. नंतर तुम्ही आणि मीच येथे असणार आहोत. तसेच वडिलधाऱ्यांबद्दल कायमच आदर होता, आजही आहे. शरद पवार नाव न घेता आयुष्यात एकही कुस्ती न खेळलेले कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले, त्यांना डाव तरी माहिती आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत, अजित पवार हे सुनेत्रा पवार यांची पर्स घेऊन दिल्लीत जाणार का? अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती, त्याला उत्तर देताना सदानंद सुळे हे तुमची पर्स नेतात का? असा सवाल अजित पवार यांनी केला,
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “साहेबांचा विरोध असताना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले. राजकारणाचे बाळकडू मीच दिले. माझ्यावरच टीका करता का? मी तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले.” रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या सभेत भावुक झाले, तो घागा पकडून अजित पवार म्हणाले, “डोळ्यातून पाणी काढण्याची नौटंकी करू नका; विकासरावर बोला, रडीचा’…तर डाव खेळायचा नाही.”
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रचाराच्या निमित्ताने जेथे जेथे गेले तेथे लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. लोकांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याने मी कमालीची समाधानी आहे, लोकांना बदल हवा आहे आणि आता विजय दूर नाही असेच चित्र दिसते आहे. महायुतीतील सर्वच पक्षातीत पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी माझ्या प्रचारासाठी धावपळ केली. त्या बद्दल मी कृतज्ञ आहे.