जालना: बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज राजकीय नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी मतदारसंघात सभांचा धडका लावला आहे. तर अजित पवार यांचे धाकडे चिरंजीव जय पवार यांनी थेट मुंबईतून आंतरवाली सराटी गाठत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात बारामतीत मतदान होत आहे. त्याआधी जय पवारांची ही भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची आज मतदारसंघात सांगता सभा होत आहेत. अशातच जय पवार यांनी मुंबईहून आज हेलिकॉप्टरने जालन्यातील अंतरवाली सराटीत धाव घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तर जरांगे पाटील यांनी देखील जय पवार यांचं स्वागत केल. या भेटीत दोघांमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही. तर भेटीनंतर जय पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, राज्यात मागील काही महिन्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यातच बारामतीत सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यासाठी येत्या ०७ मे रोजी मतदान पार पडत आहे. अशातच मतदानाच्या दोन दिवसाआधी जय पवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा सुरू आहे.