पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुरु असलेली नणंद विरुद्ध भावजय लढत देशात चर्चेचा विषय झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी भाजपचे नेतेही आता बारामती आणि पुण्यात ठाण मांडून आहेत. याच मालिकेत शायना एनसी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की जर इटलीची सुन तुम्हाला चालते. इटलीच्या सुनेचा तुम्ही स्वीकार केला, तर बारामतीची सुन बाहेरची आहे, हे म्हणणं तुम्हाला शोभतं का? जेव्हा एक महिला लग्न करुन तुमच्या घरात येते. सक्रीय पद्धतीने सामाजिक क्षेत्रात काम करते. अशा महिलेला काम करण्याची संधी दिली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस – महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार सुनेत्रा पवार या चाळीस वर्षांपासून अजित पवार यांच्या बरोबरीने सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. सुनेत्रा पवारांनी टेक्स्टाईल इंडस्ट्री, शिक्षण, आर्थिक क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वातील कंपनीमध्ये 15 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांच्या संस्थांमध्ये महिलांना सन्मान मिळत आहे. अशा महिलेला गृहिणी कसे म्हणता येईल, असा सवाल शायना एनसी यांनी उपस्थित केला.
महिलांनी राजकारणात आलं पाहिजे असं सर्वच म्हणतात. मग एक गृहिणी राजकारणात येऊ शकत नाही का, असा सवाल उपस्थित करत शायना एनसी म्हणाल्या की, सुनेत्रा पवार याविविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात कित्येक वर्षांपासून सक्रीय आहेत. पर्यावरण विषयक संघटनेच्या त्या सदस्य आहेत. जमीनीवर काम करणाऱ्या त्या कार्यकर्त्या आहेत. अशा महिलेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना लोकसभेत पाठिंबा देणे आवश्यक आहे.
खासदार सुप्रिया सुळेंचे नाव न घेता शायना एनसी म्हणाल्या की, फक्त कोणाची तरी मुलगी आहे म्हणून मला निवडून द्या म्हणणाऱ्या काही आहेत. तर दुसरीकडे जमीनीवर काम करणाऱ्या महिलाचा पर्याय बारामतीकरांसमोर उपलब्ध आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काम करणारं कोण आहे आणि लुटियन्स दिल्लचं कोण आहे, याचं उत्तर तुम्हाला बारामतीची जनता देईल, असेही शायना एनसी म्हणाल्या.