पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातुन पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद लावली आहे. प्रचारसभांचा धडाका लावत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिकेचे वार करत १५ वर्षांत काय विकास झाला असे प्रश्न अजित पवार सभेतून विचारत आहेत. मात्र आपल्या भावाबद्दल कधीही न बोलणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातल्या सभेत मौन सोडलं. सध्या विरोधक कोणी लिहून दिलेलं भाषण वाचत आहे हे माहीत नाही. पण माझ्यात एवढे वाईट गुण होते तर अठरा वर्ष का गप्प बसलात? आताच असं काय झालं आहे बोलायला? असे सवाल करत सुळेंनी अजित पवारांना जाब विचारला आहे.
सुप्रिया सुळेंसाठी उद्धव ठाकरे यांनी पुण्यात सभा घेतली. ही सभा पुण्यातल्या वारजे येथे पार पडली. सभेला काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उमेदवार सुप्रिया सुळे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहर प्रमुख गाजानंद ठरकुडे, आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे यापूर्वी मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर २००९ मध्ये सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वारजे येथे सभा घेतली होती. त्यानंतर २०११ च्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी हर्षदा वांजळे यांच्या प्रचारार्थ वारजे येथे सभा झाली होती. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी पंधरा वर्षानंतर वारजे येथे सभा घेतली .