गड किल्ल्यांचे संवर्धन करणार मुरलीधर मोहोळ

Pune Loksabha Election Murlidhar Mohal and Hemraj Dhangekarkar

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच राज्यातील गडकोट आणि दुर्गांच्या संवर्धनाचे काम कर्तव्य भावनेतून मी करीन, असे आश्वासन महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जनसंवाद मेळाव्यात मुरलीधर मोहोळ बोलत होते. पुणे शहरातील २७ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थनार्थ हिंदू जनसंवाद मेळाव्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक उपस्थित होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी श्रीराम मंदिराचा संघर्ष मांडताना हिंदू म्हणून संघटित राहण्याचे आवाहन केले.

महायुतीचे उमेद्वार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना पुण्याच्या संस्कृती रक्षणाची व विकासाची गॅरंटी पटवून दिली. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारत सरकारकडून शिवाजी महाराज यांच्या काळातील १२ किल्ल्यांचे नामांकन पाठवण्यात आले आहे. रायगडासह साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा त्यात समावेश आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी केंद्र सरकारकडून भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये असा प्रस्ताव युनेस्कोकडे देण्यात आला आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. 

या यादीतील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या परिसरातील आहेत. सतराव्या ते एकोणीसाव्या शतकादरम्यान बांधलेल्या या किल्ल्यांच्या माध्यमातून मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी शक्तीचे दर्शन होते. या आणि अशा अनेक किल्ल्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या किल्ल्यांचे जतन, संवर्धनाचे काम मी कर्तव्य भावनेतून करीन, अशी ग्वाही मोहोळ यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.