लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोमाने प्रचार सुरु आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सणसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सभेत बोलत आहेत. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अजित पवार बोलत आहेत.
“सोलापूर हायवे लगतच्या अनेक गावांचा प्रश्न प्रामुख्याने ग्रामस्थांनी सांगितला आहे. बारामती एग्रोमार्फत पुढील हंगामात ऊस घालण्याबाबत दम दिला जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितल आहे. ऊस न घालण्याचं कारणही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या, असं शेतकरी म्हणत आहेत. काही घाबरु नका, कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल”, असं म्हणत अजित पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.