पुणे: बारामतीत पवार विरुद्ध पवार, अशी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. दोघींकडूनही दणक्यात प्रचार सुरु आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या गावात सुनेत्रा पवार संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत असल्याचे दिसत असून शेवटच्या काही दिवसांत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न त्या करताना दिसत आहेत. माझ्या सामाजिक कार्याची सुरुवातच मी काटेवाडी गावातून केली आहे. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण आहे. या प्रश्नांची सोडवणूक करणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करत राहीन, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी मतदारांना दिली.
अजित पवारांचा वादा आणि मोदींची गॅरंटी याचा रोज प्रचारादरम्यान प्रत्यय येत आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडू पण तुम्ही आम्हाला मतदान करुन विजयी करा, असं दमदार भाषण सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसमोरच केलं होतं.
सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी हा अजितदादांचा आग्रह असतो. त्यांच्या कामाचा आवाका आणि पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा घेवून मी ही निवडणूक लढवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्नांची सोडवणूक करण्यावर आपला भर असेल असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची वज्रमूठ घट झाल्याचं आपण पाहतो. ही एकजूट कायम ठेवून सर्वांनी आपल्या भागातून घड्याळाला अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या उज्वल भवितव्यासाठी घड्याळाला अधिकाधिक मतदान करुन आपल्या हक्काच्या व्यक्तीला खासदार म्हणून तुम्ही संसदेत पाठवाल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.