सदावर्ते दाम्पत्यांना सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्द

gunaratna-sadavarte-and-jayshree-patil-remove-them-from-expert-director-post-of-msrtc-cooperative-bank

 वकील गुणरत्न सदावर्ते यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते दाम्पत्य यापुढे एसटी बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून कामकाज करू शकणार नाही. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या तक्रारीनुसार, ४ ऑक्टोबर २०२३ मध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली होती.


या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यावर नथुराम गोडसे यांचे फोटो प्रिंट करण्यात आले होते. तसे पाहता, एसटी बँक, एसटी कर्मचारी यांचा या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना १४ दिवसआधी सभेची सूचना देणे आवश्यक होते.


परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. दरम्यान, सदावर्ते यांच्या पॅनलने आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हवे त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारच्या एकूण १३ बेकायदेशीर विषयांची तक्रार श्री संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती. यातील बहूसंख्य विषयांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच सदावर्तेंनी नियम मोडल्याचं निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली. दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. अशी कोणतीही कारवाई झाली नाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.