पुणे: शहरातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. रविंद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या मध्ये चांगलीच जुंपलेली दिसत आहे. धंगेकरांना प्रतिउत्तर देताना मोहोळांनी उद्देशून एक्सवरती पोस्ट करत म्हणाले की, “लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच!” आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरे यांनी मत नोंदवलं आहे. “कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला, तो दुर्देवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते” असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. “नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या, त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे” असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
“सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशीकडेही लक्ष द्यावे. तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे. नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का?” असं वसंत मोरे म्हणाले.
यासह कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत. भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. असा इशाराही त्यांनी दिलाय. तसेच पोलीस यंत्रणनेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपुर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट केले पाहिजे. अन्यथा वंचित बहुनज आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झालीतर त्याला संपुर्णपणे जबाबदार ही भ्रष्ठ यंत्रणा असेल असा इशाराही त्यांनी दिलाय.