पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाकडून कशाप्रकारे बचावकार्य सुरु आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. या आढावानंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “सगळ्या धरणांचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत. पाऊस आटोक्यात आला आहे. पण नागरिकांना विनंती आहे घाबरु नका. पुण्यात सिंहगड रोड भागात आर्मी तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफचे ४० लोकं तैनात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा या परिस्थितीवर लक्ष आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.
पुण्यात सिंहगड रोड परिसरात अनेक भागांमध्ये आज खांद्यापर्यंत पाणी साचलं. खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे सिंहगड रोडवर असलेल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं. दुपारनंतर पाण्याची पातळी कमी झाली होती. पण आता पुन्हा पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. या भागात बचावासाठी आर्मी तैनात करण्यात आली आहे. तसेच एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात थेट रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी एकता नगर येथे जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांसोबत बातचित केली. यावेळी अनेक नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या तक्रारी मांडल्या.
एका महिलेने अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं. यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या. एकता नगर भागात पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण अजित पवार यांनी काळजी न करण्याचं आवाहन केलं आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांवर पोहोचावा यासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यास सांगितलंय, जेणेकरुन रात्रभर पाऊस पडला तर खडकवासला धरणात पाणी शिल्लक राहावं, असं अजित पवारांनी नागरिकांना सांगितलं.
यावेळी एक महत्त्वाची तक्रार नागरिकांनी केली. खडकवासला धरणातून पाणी सोडताना सूचना का दिल्या नाहीत? असा सवाल नागरिकांनी अजित पवारांना केला. यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. यावेळी काही अधिकाऱ्यांनी सूचना केल्या असल्याचं सांगितलं. पण संबंधित परिसरात तशी अनाउंसमेंट झाली नसल्याची तक्रार काही नागरिकांनी केली.
अजित पवारांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ग्राउंड फ्लोअरच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे. काही दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे. आता मी आयुक्तांना पंचनामे करायला सांगितले आहे. दहा-पंधरा दुकाने आणि 80 ते 85 घरांचं नुकसान झालं आहे. पंचनामे केले जातील आणि योग्य सहकार्य राज्य सरकार आणि महापालिका करेल”, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.
“आम्ही पाऊस ओसरल्यावर जलसंपदा विभाग, महापालिका अधिकारी मिळून पाहणी केली जाईल. पलिकडच्या बाजूला खरोखरंच गाळ निर्माण झालाय का, त्यामुळे पाणी वहन करण्याची क्षमता कमी झाली आहे का? ते तपासलं जाईल. यामध्ये काही चूक असेल तर ते दुरुस्त करण्याची आमची तयारी आहे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
“मला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवढं खडकवासला धरण कमी करता येईल तेवढं करायचं आहे. आम्हाला 6 वाजेपर्यंत खडकवासलाचं पाणी 50 टक्क्यांपर्यंत आणायचं आहे, जेणेकरुन रात्री पाऊस पडला तरी खडकवासल्यात पाणी साठता यावं. काही जण म्हणाली अलर्ट दिला पण तो तिकडनं गेला, आमच्यापर्यंत आला नाही. आता आमच्या आयुक्तानाही समजलं आहे. ते सकाळीदेखील या भागात आले होते, आताही आले आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
“आता पाण्याची पातळी वाढत चालली आहे. सखल भागात पाणी जात आहे. आम्ही तिथे पहिल्यांदा अलर्ट करण्याचं काम करु. आम्हाला माध्यमांना आवाहन करायचं आहे की, ज्या भागासाठी अलर्ट राहण्यास सांगितलं आहे त्याबाबतची माहिती लवकर प्रसारित करावी. जे झालंय ते आम्ही नाकारत नाही. नुकसान झालेल्यांचा पंचनामा केला जाईल. सरकारकडून योग्य ती मदत केली जाईल”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.