पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांसोबत प्रवाशांचे देखील हाल होत आहे. पुण्यात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जवजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे महानगर पालिका प्रशासनाकडून नागरिकांना मदत केली जात आहे.
पुण्यातील सिंहगड रोडसह नदीकाठच्या भागांमध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. रिव्हर व्ह्यूव रेसिडेन्सी या ठिकाणी महानगर पालिकेची रेस्क्यू टीम काम करत आहे, लोक बाहेर सेफ ठिकाणी जात आहेत, अजून काही काही लोक अडकलेली आहेत. महिला आणि वयस्कर लोक अजूनही घरांमध्येच अडकून पडलेली आहेत, आता या भागामध्ये प्यायलाही पाणी नाही अशी माहिती भेटत आहे. पालिकेकडून दूध, पाणी आणि बिस्किटांचे वाटप केले. पार्किंग ला लावलेल्या चारचाकी आणि दुचाकी पाण्याखाली गेल्या आहेत.
खडकवासला धरणांमधून सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे त्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. परंतु पावसाचा जोर असाच राहिल्यास तो वाढू शकतो. पालिकेकडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.