"धार्मिक, वैचारिक गुलामगिरी तोडणारे लिखाण अण्णाभाऊ साठे यांनी केले", प्रा. कांबळे

Annabhau-Sathe-wrote-books-that-broke-the-religious-and-ideological-slavery

 

पुणे : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खूप प्रेम होते, बाबसाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. जात हे विष असल्याचे सांगत जाती - धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणुसकीचे समर्थन केले.  अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून वंचित - शोषितांच्या समस्या जगासमोर मांडल्या,  बंडखोर स्त्री पात्रांच्या माध्यमातून धार्मिक, वैचारिक गुलामगिरी तोडणारे लिखाण केल्याचे प्रतिपाडान ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे यांनी केले. 


सम्यक विहार व विकास केंद्र, शाहू चौक, बोपोडी पुणे येथे  विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  'साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४' च्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रा. सुकुमार कांबळे बोलत होते.  याप्रसंगी  दिवंगत लोकशाहीर दिनानाथ रामचंद्र साठे,  दिवंगत विनायक जाधव यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले ते अनुक्रमे विलास साठे आणि संगीता जाधव यांनी स्वीकारले.  तसेच ज्येष्ठ विचारवंत रमेश राक्षे यांना ही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे, सुनिता वाडेकर (माजी उपमहापौर, पुणे), अविनाश कदम (अध्यक्ष, शिवाजी नगर मतदार संघ आरपीआय), विठ्ठल गायकवाड, समितीचे सरचिटणीस दीपक म्हस्के आदी उपस्थित होते. 


पुढे बोलताना प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, महापुरुषांनी जातीच्या भिंती तोडत सर्वांना सोबत घेऊन जाणारी वाट निर्माण केली मात्र आज आपल्याकडे प्रत्येक जातीला एकमेकांपासून वेगळे करण्याचा डाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य काही शक्ती आखत आहेत. अनुसूचित जातीतील बौद्ध विरुद्ध अन्य जाती अशी फुट पाडण्याचा प्रयत्न हा त्याचाच भाग आहे.  आपल्याला संविधान वाचवायचे असेल तर दलित, बहुजन समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रा. कांबळे यांनी नमूद केले. 


सत्काराला उत्तर देताना रमेश राक्षे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम वाडेकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे महागायक विजय कावळे यांचा परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले तर आभार सुनीता वाडेकर यांनी मानले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.