पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून कोथरूड विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात थंड थोपटले आहेत. बालवडकर यांनी कोथरूडमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूलाही भाजपकडून मतदारसंघात मोठ्या राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. अशातच अमोल बालवडकर यांनी बंडाची भूमिका घेतल्याने भाजपकडूनही आता कार्यकर्त्यांना ताकद देण्यात येत आहे. याठिकाणी गणेश कळमकर, राहुल कोकाटे, लहु बालवडकर, प्रल्हाद सायकर, ज्योती कळमकर, सायली सायकर, प्रकाश तात्या बालवडकर हे चंद्रकांत पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. यातच आता पुणे शहराचे चिटणीस लहू बालवडकर यांच्याकडे भाजपने आता 'कोथरूड उत्तर मंडळ संयोजक' पदाची जबाबदारी सोपविली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यासंदर्भात एक पत्र काढून त्यांची नियुक्ती केली आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील आपला अनुभव पुणे शहरात पक्षाचा संघटनात्मक विस्तार आणि पक्ष बांधणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. राष्ट्र प्रथम या भावनेतून आपण भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहोचवून, पक्षाने दिलेल्या कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी कराल असे धीरज घाटे यांनी पत्रात म्हटले आहे. भाजपने लहू बालवडकर यांची नियुक्ती करून अमोल बालवडकर यांना झटका दिला आहे का ? अशीही चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात शहरात कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून लहू बालवडकर भाजपच एकनिष्ठाने काम करीत आहेत. बालेवाडी-बाणेर, सुस- म्हाळुंगे ,औंध या भागात त्यांनी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांशी जनसंपर्क वाढविला आहे. लोकसभा निवडणूकीच्या दरम्यानही त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला होता. यातच चंद्रकांत पाटील यांचे अत्यंत जवळीक असलेले नेते म्हणून त्यांची ओळख राहिली आहे.