सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे - डॉ. मोरेश्वर सुखदेवे


Bodhisattva-Cooperative-Hospital-medical-facilities-at-affordable-rates-Dr-Moreshwar-Sukhadeve


पुणे: बदलत्या जीवनशैलीमुळे आज आपल्याकडे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. समाजातील खालच्या स्तरातील लोकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा माफक दरात मिळणे ही काळाची गरज आहे.  आरोग्य विषयक सोई सुविधा  सामान्य नागरिकाच्या आवाक्यात असतील तरच सुदृढ समाज निर्माण होईल असे मत नाबार्ड चे माजी महाप्रबंधाक, राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष  तथा बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित, पुणेचे अध्यक्ष डॉ. मोरेश्वर सुखदेवे यांनी व्यक्त केले. 


बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित, पुणे च्या  अधीमंडळाची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे इंटरनॅशनल स्कूल, विद्यानगर येथे संपन्न झाली यावेळी डॉ. सुखदेवे बोलत होते. याप्रसंगी ससुन रुग्णालय,बी. जे. मेडिकल कॉलेज चे माजी प्राध्यापक तथा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. टी. गायकवाड, सहकार विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. आनंद जोगदंड, इंजि. पोपटराव वाघमारे,  डॉ. मंगल आयरेकर, डॉ. उज्वला बेंडे, इंजि. अनिलकुमार सुर्यवंशी, राजाभाऊ काळबांडे, प्रा. गौतम मगरे , दीपक म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. मोरेश्वर सुखदेवे म्हणाले, बोधिसत्व सहकारी रुग्णालय हे राज्यातील पहिले सहकारी रुग्णालय आहे. सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात आरोग्यसेवा देण्याचा आमचा उद्देश आहे. आज आमचे 1900 सभासद आहेत. आज एक ओपीडी, एक रुग्णालय सुरू केले आहे. भविष्यात एक सुसज्ज रुग्णालय स्व मालकीच्या इमारतीत उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत, लोकसहभागातून उभा राहणारा हा प्रकल्प राज्याला  दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी  करत भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा मानस असल्याचेही डॉ.  सुखदेवे यांनी सांगितले. 


डॉ. पी. टी. गायकवाड म्हणाले, सहकारी तत्वावरील रुग्णालय ही वेगळी संकल्पना घेऊन आम्ही तीन वर्षे सामाजिक कार्य करत आहोत, टिंगरे नगर येथील ओपीडी आणि दापोडी  येथे 30 खटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील दोन महिन्यापूर्वी सुरू केले आहे,  याला रुग्णांचा चांगला फिडबॅक मिळत आहे, विविध आजारांवर माफक दरात सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  विविध स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि उपकरणे आमच्याकडे उपलब्ध आहेत याचा सामान्य, गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. 



डॉ. आनंद जोगदंड म्हणाले, राज्यातील पहिल्या सहकारी रुग्णालयांसाठी आम्ही बघितलेले स्वप्न आता आकार घेत आहे. एक ओपीडी, एक रुग्णालय यानंतर आता आम्हाला म्हाडाच्या वतीने एक जागा उपलब्ध झाली असून त्याठिकाणी सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्या जमिनीची खरेदी आणि बांधकाम यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी सभासदांनी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी  पुढे यावे असे आवाहन डॉ. जोगदंड यांनी केले. 


दरम्यान, सभेमध्ये 2023 - 24 या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदास मान्यता आणि 2024 - 25 चे अंदाजपत्र मंजूर करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.