वडगावशेरी पाठोपाठ हडपसर मतदारसंघातही नवा ट्विस्ट, दादांच्या आमदारापुढे वाढता पेच

Nana-Bhangire-s-letter-goes-viral-in-Hadapsar-assembly-constituency


हडपसर: पुण्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी पहायला मिळत आहेत. वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवारीवरुन वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आणि भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे इच्छुक असून जगदीश मुळीक यांनी मतदारसंघातील मतदारांना पत्र लिहत भावनिक साद घातली आहे. तसेच चित्र आता हडपसरमध्येही पहायला मिळाले आहे.


हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक असणारे प्रमोद नाना भानगिरे यांनी मतदारसंघातील मतदारांना भावनिक पत्र लिहले आहे. नाना भनगिरे यांनी पत्रातून मतदारांना भावनिक साद घातली तसेच पुण्यातील ८ पैकी ३ जागांवर विशेष दावा केला आहे. हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला या ३ जागांवर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे.


हडपसरमध्ये २ टर्म शिवसेनेचा आमदार होते. २०१९ मध्ये महायुतीच्या जागावाटपामध्ये सेनेला एकही जागा सोडली नाही. मात्र आता गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ३०० कोटींचा निधी हडपसरसाठी आणलेला आहे. हडपसरची जागा शिवसेनेला मिळावी. हा आमचा आग्रह शेवटपर्यंत राहणार. शेवटी महायुतीचा जो निर्यण होईल, तो आम्हाला मान्य असेल’, असे प्रमोद नाना भानगिरे म्हणाले आहेत.


दरम्यान, नाना भानगिरे यांच्या उमेदवारीच्या दाव्यामुळे हडपसर मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकीकडे महायुतीतील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्याने सुखावले आहेत. तर आता भानगिरेंच्या या पत्रप्रपंचामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. महायुतीत निर्माण झालेली ही स्पर्धा कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.