पुणे: गणेशोत्सवात प्रमुख आकर्षण असलेल्या ढोल ताशा पथकांकडून पुण्यात जोरदार तयारी सुरू आहे. अशातच पुण्यात महाराष्ट्रातील तृतीयपंथीय समुदायाने एक नवा इतिहास रचत गणेशोत्सवासाठी ढोल ताशा पथक तयार केलं आहे, जे राज्यातील पहिलं अशा प्रकारचं पथक आहे. हे पथक केवळ आपल्या कलागुणांद्वारेच नव्हे, तर समाजातील तृतीयपंथीयांच्या हक्कांची आणि मान्यतेची ओळख म्हणूनही उभं राहिलं आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील पहिलं तृतीयपंथीय ढोल ताशा पथक गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होणार आहे. या पथकाने आपल्या कठोर परिश्रम आणि उत्साहाने गणेशभक्तांची मनं जिंकण्याची तयारी केली आहे. . तृतीयपंथीयांचा हा सहभाग समाजात समावेशकतेचा आणि समानतेचा संदेश देणारा आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव विशेष असेल.
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात तृतीयपंथीयांनी एकत्र येत तयार केलेल्या राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय ढोल ताशा पथकाला "श्रीखंडी" हे नाव दिलं आहे. पुणे शहरात साधारणत: दोनशेहून अधिक ढोल ताशा पथकं आहेत, आणि या पथकांमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमालीचा उत्साह पाहायला मिळतो. "श्रीखंडी" पथकातील तृतीयपंथीयांनी स्वतः ढोल ताशे वाजवायला शिकून, या सणाच्या तयारीला लागले आहेत. हे पथक गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये उत्साहाने सहभागी होणार असून, त्यांनी सुपारी घेऊन वादनाला प्रारंभही केला आहे.
या उपक्रमामुळे तृतीयपंथीयांना समाजात एक नवी ओळख आणि मान्यता मिळेल. तसेच, गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कलागुणांना एक नवं व्यासपीठ दिलं आहे, ज्यामुळे यंदाचा उत्सव अधिकच खास होणार आहे.