पुणे: शहरात वाढत चाललेल्या गुंडगिरी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करत, विशेषत: सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या हिंसक आणि दहशतीचे प्रतीक असणाऱ्या व्हिडिओंवर कडक नजर ठेवली आहे. यासह, अशा व्हिडिओंना लाईक करणाऱ्या नागरिकांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात गुंडांकडून सोशल मीडियावर दहशत पसरवण्यासाठी तलवारी, कोयते, शस्त्रे यांसारख्या गोष्टी वापरून व्हिडिओ प्रसारित करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही व्हिडिओंमध्ये वाढदिवसाच्या केकला तलवारीने कापणे, शस्त्रांचा गर्व दाखवणारी दृश्ये दाखवली जात आहेत. या प्रकारांच्या व्हिडिओंना अनेक युजर्स लाईक करतात, मात्र आता असे करणे त्यांच्यासाठी महागात पडू शकते.
पोलीस आयुक्तांची 'अँक्शन मोड'वर जोरदार कारवाई
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडगिरी मोडून काढण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहेत. या पथकांना सोशल मीडियावर नजर ठेवून अशा व्हिडिओंचे प्रसारण करणाऱ्या गुंडांची झाडाझडती करण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच, या व्हिडिओंना लाईक, शेअर किंवा समर्थन करणाऱ्यांची चौकशीही करण्यात येणार आहे.
सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी घ्यावी काळजी
पोलीस आयुक्तांच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर अधिक काळजीपूर्वक वागणे आवश्यक झाले आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसक किंवा दहशतीला प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडिओंना लाईक करताना, नागरिकांनी त्याचे गंभीर परिणाम विचारात घ्यावेत. व्हिडिओंना दिलेला पाठिंबा, त्यामागील गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन ठरू शकतो आणि त्यामुळे सामान्य नागरिकांनाही पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते.
गुन्हेगारीला समाजातून पूर्णतः हद्दपार करण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट
पुण्यात वाढलेल्या गुंडगिरीला थांबवणे आणि समाजात शांती प्रस्थापित करणे हे पुणे पोलिसांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.