पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच मोदींचा दौरा रद्द करण्याचे वृत्त समोर आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पुणे दौऱ्यावळी पंतप्रधान मोदी दोन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करणार होते. हा दौरा रद्द झाल्याने पुणे मेट्रोचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.
पंतप्रधान मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येणार होते. आज सायंकाळी त्यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार होती. परंतु, या सभेवर जोरदार पावसाचे सावट आहे शहरातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा देखील होणार होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे सभास्थळी मोठ्या प्रमाणात चिखळ झाला होता. या ठिकाणी मुरूम-खडी टाकून चिखल कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. पण ते यशस्वी न झाल्याने सभेचे स्थळ बदलले जाणार अशी चर्चा सुरू होती.
कसा होता पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा?
पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकात येणार होते. तिथून ते मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. स्वारगेटवरून गाडीने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार होती. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचाही समावेश होता. तसंच ते भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते.सभेनंतर फर्ग्यूसन महाविद्यालय परिसरात त्यांच्या रोड शोचेही आयोजन करण्यात आले होते.
पर्यायी जागेचाही शोध
राज्यभरात कालपासून मुसळधार पाऊस बुधवारी पुण्यातही जोरदार पाऊस झाला. त्याच पावसामुळे मोदींच्या सभेतही खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यामुळे पर्यायी जागांचा शोध घेऊन सभेसाठी तेथेही चाचपणी करण्यात आली होती. एस.पी. कॉलेजच्या प्रांगणात जिथे मोदींची सभा होणार होती, तेथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून सततच्या पावसाने मंडप संपूर्ण ओलाचिंब झाला. सगळीकडेच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींची सभा कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र याला पर्याय म्हणून दुसऱ्या जागांची चाचपणी सुरू आहे. आजही पाऊस आला तर नरेंद्र मोदी यांची सभा स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा सभागृहात घेण्यासाठी भाजपकडून तयारी करण्यात होती. मात्र आता पंतप्रधान मोदींचा आजचा संपूर्ण दौराच रद्द झाला आहे.