पुण्यातील डॅशिंग, आक्रमक नेते अशी ओळख असलेले पुणेकरांचे तात्या अर्थात वसंत मोरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते असलेले वसंत मोरे यांनी पुण्यात घडलेल्या गंभीर विषयाला हात घातला आहे. सोशल मीडियाच्या आधार घेत या विषयाला वाचा फोडली. स्वत: हातोडा हातात घेऊन कारवाई केली आहे. पुण्यातील कात्रज भागात एका गाईची हत्या झाली होती. त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी स्वत: त्या व्यक्तीच्या गोठ्यातील काही अनिधिकृत बांधकाम तोडले आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
गोठ्यावर हातोडा चालवला
कात्रजमधील मांगडेवाडी भागातील एका गोठ्यात शनिवारी गाईची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची माहिती वसंत मोरे यांना मिळाली. त्यानंतर वसंत मोरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्या गोठ्यावर हातोडा चालवला. तसेच या व्यक्तीच्या मागे आणखी कोण, कोण आहेत? त्याचा शोध घ्यावा, पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली.
दोन, तीन लोकांना अटक
सोशल मीडियावर बोलताना वसंत मोरे म्हणाले, या प्रकारचा आम्ही निषेध करत आहोत. गाईच्या हत्येची तक्रार पोलिसांकडे गेली. त्यानंतर दोन, तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. गाईची हत्या करणार व्यक्ती हिंदू धर्मातील असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला. त्या ठिकाणी आता पुणे मनपाने कारवाई करावी. या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली पाहिजे. आरोपींना जामीन होऊ देऊ नये. कात्रज भागात असा प्रकार पुन्हा होऊ देऊ नये. अन्यथा, आम्ही परिणामांची पर्वा न करता कारवाई करु, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.