पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीत अंतिम जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. येत्या एक ते दोन दिवसात अंतिम जागावाटप होऊन उमेदवारांची देखील घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. मात्र, काही मतदारसंघात विद्यमान आमदारांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करून दिली आहे. अशातच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघात राजकीय हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्राचं सांस्कृतिक माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. त्यात पुण्याचं सांस्कृतिक माहेरघर म्हणून कोथरूडची ओळख आहे. हेच वैशिष्ट्य लक्षात घेऊन मेनका प्रकाशनानं कोथरूड दिवाळी अंकाची निर्मिती केली आहे. या दिवाळी अंकाचे प्रकाशन करून चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला आहे.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर त्यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड नाराजी दिसून आली. अशा परिस्थितीत देखील चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले. पाच वर्षाच्या काळात त्यांनी अनेक लोकप्रिय योजना अंमलात आणल्या. खासकरून तरूण मुली आणि महिलांसाठी चंद्रकांत पाटील यांनी उपक्रम घेत भरीव मदत केली आहे. यामध्ये मुलींना शैक्षणिक फी पासून ते स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण, वैद्यकीय मदत अशी कामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत.
यातच आता 'मेधा कुलकर्णी' यांना राज्यसभेवर घेऊन नाराज कार्यकर्त्यांची देखील नाराजी दुर झाली आहे. त्यामुळे त्यांचं मतदारसंघात आणखी वजन वाढल्याचे दिसून येते. २००९ साली मतदारसंघाची विभागणी झाल्यानंतर शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आमदार झालेत. त्यानंतर २०१४ साली मेधा कुलकर्णी यांनी हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आणला. तर चंद्रकांत पाटील यांनी देखील मतदारसंघात पुन्हा कमळ फुलवलं. आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.