पुणे: कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांंनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या रॅलीत कोथरुडकरांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य कोथरुडकर मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. कोथरूड मधून नामदार चंद्रकांतदादा पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा शपथ घेणार असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवीजी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खा. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपकभाऊ मानकर, आ. भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर भाजप सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोथरुड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडीमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी शंकर महाराज, कसबा गणपती, मृत्यूंजयेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. या वेळी कोथरुड मधील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता.
कोथरूडकरांच्या मनातला आमदार, कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, सर्वसामान्यांचा नेता पुन्हा होणार विजेता, था थकत ना थांबत जनसेवेसाठी दादा सदैव कार्यतत्पर अशा आशयाचे फ्लेक्स घेऊन अनेक कार्यकर्ते आणि कोथरुडकरांनी दादांना प्रतिसाद देत होते. या रॅली दरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कार्यालय, हुतात्मा चौक, दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉट येथे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दादांचे स्वागत करण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोथरुडच्या जनतेने भारतीय जनता पक्षावर नेहमीच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत.देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे गेल्या १० वर्षातील विकासकामे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची राज्यभरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी राबविलेल्या योजना आणि कोथरुडचे आमदार म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात राबविलेले सेवा उपक्रम आणि विकासकामे यामुळे कोथरुडची जनता समाधानी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोथरुड मधून नामदार चंद्रकांतदादा पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येतील हे आजच्या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सिद्ध झाले आहे, असा विश्वास व्यक्त केला.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कोथरूडकर जनतेने भारतीय जनता पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी बनवले. त्यामुळे आजच्या रॉलीला मिळालेला प्रतिसाद पाहून कोथरुड विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.