विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नामदार पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, भाजपा कोथरूड दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुनीत जोशी, गणेश कळमकर, सुशील मेंगडे, गिरीश भेलके, लहू बालवडकर, प्रल्हाद सायकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा कांचन कुंबरे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी नेहमीच पात्र राहत आलो आहे. मला उमेदवारी दिल्याबद्दल माननीय नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह, जे. पी. नड्डाजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सह सर्वांचे मनापासून आभार मानतो. कोथरूड विधानसभा मतदारसंघामधील सर्व मतदारांनी भारतीय जनता पक्ष महायुतीवर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. लोकसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. विधानसभा निवडणुकीत ही कोथरूडची जनता भारतीय जनता पक्ष महायुतीला भरभरून आशीर्वाद देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, आपल्या पक्ष नेतृत्वाने चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एक लाखाच्या मताधिक्याने दादांना विजयी करायचं आहे. आजपासून प्रत्येक मिनिट आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा आहे. भारतीय जनता पक्ष महायुयीचे सैन्य आपल्या सेनापतीला विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.