पुण्यातील दुबईस्थित जैनम आणि जीविका जैन यांनी हजारो नागरीकांना ज्ञानदानातून दिली प्रेरणा

Pune-based-Dubai-based-Jainam-and-Jeevika-Jain-have-inspired

पुणे: पुणे येथील सध्या वास्तव्यास दुबई येथे असलेल्या जैनम आणि जीविका जैन यांनी राज्याच्या विविध भागात ५० दिवसांचा प्रवास करत भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार केला. "मिशन ५०", च्या माध्यमातून बालचमुनी अध्ययन आणि वाचन केलेल्या पुस्तकांमधून भारतीय संस्कृतीची मूल्ये विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवली. या दिवसांत त्यांनी पुणे, नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर आदी भागातील गावात जाऊन १२० कार्यक्रम आयोजित करून हजारो नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवले.


जैनम (वय १२ वर्ष) आणि जीविका (वय १० वर्ष) यांनी ठरवले की त्यांच्या सुट्ट्यांचा उपयोग केवळ मौजमजेसाठीच नाही तर समाजातील नागरिकांना प्रेरणा देण्यासाठी करायचा. त्यांच्या मनात एकच विचार होता- ' ज्ञान फक्त आपल्यापुरतेच नको, तर ते इतरांसोबत वाटावे. आणि म्हणूनच त्यांनी राज्यातील विविध भागात दौरा करत जाऊन "मिशन ५०" सुरु केले. सुरुवातीला त्यांनी शंभर कार्यक्रमांचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु नागरिकांचा भरभरून प्रतिसाद पाहता ते १२० कार्यक्रम यशस्वी पार पाडले. यात उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व नागरिकांपर्यंत भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजविण्यात त्यांना यश आले. 


या प्रवासादरम्यान, जैनम आणि जीविकाने भारतीय संस्कृतीचे महत्व नागरिकांना पटवून सांगितले. त्यांनी मुलांना आणि तरुणांना आपल्या संस्कृतीशी जोडून राहण्याचे महत्व पटवले, ज्यामध्ये कुटुंबातील एकता, आदर, आणि आपल्या मूळ परंपरांशी नाळ जोडलेली ठेवण्याचे महत्त्व आहे. या संदेशाने नागरीकांना त्यांच्या जीवनाच्या मूल्यमानांबद्दल विचार करायला भाग पाडले. त्याशिवाय, त्याच्या 'मैजिकल सायन्स' या सत्राने विज्ञानाला मुलांसाठी मजेदार बनवले. त्यांनी सोप्या विज्ञान प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानातील जिज्ञासा जागवली आणि मुलांना विज्ञानाची गोडी लावली. त्यांच्या प्रयोगांनी मुलांच्या मनात विज्ञानाविषयी प्रेम आणि उत्कंठा निर्माण केली.


मुलांसोबतच्या त्यांच्या इतर सत्रांत, जैनम आणि जीविकाने उद्योजकतेवर भर दिला. जीविकाने तिच्या व्यवसायाची सुरुवात केवळ नऊ वर्षांची असताना कशी केली हे सांगितले, ज्यामुळे अनेक मुलांना प्रेरणा मिळाली. त्यांनी सांगितले की कल्पना आणि ध्येय यांच्या जोरावर वय काहीही असले तरीही मोठी स्वप्ने साकारता येतात. जैनमने आपले छंद करिअरमध्ये बदलले, याबद्दल सांगितले आणि मुलांना हे शिकवले की आपली आवडच आपल्या आयुष्यातील मार्ग दाखवू शकते.


जैनम आणि जीविकाचे "मिशन ५० हे फक्त एका प्रवासाचे नाव नव्हते, तर एक चळवळ होती-ज्ञानाच्या वाटपाची आणि प्रेरणादायी परिवर्तनाची त्यांचा संदेश साधा आणि सोपा आहे. 'वय काहीही असो, जर तुमच्याकडे ज्ञान आहे आणि इतरांसोबत ते शेअर करण्याची तयारी आहे, तर तुम्ही मोठा बदल घडवू शकता." त्यांच्या ज्ञानदानाच्या या प्रवासाने सिद्ध केले आहे की जर आपल्याकडे दृढनिश्चय असेल तर आपण केवळ आपल्या स्वतःचेच नव्हे, तर इतरांच्या जीवनातही मोठा बदल घडवू शकतो, असे जैनम आणि जीविकाचे पालक  धीरज आणि ममता जैन यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.