पुणे : 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा .., मनात देशभक्तीचे वारे .., मार्सेलिस बंदरामध्ये मारलेली उडी .., सावरकरांचा माफीनामा .. अन् 'ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला ..' या गीतातील आर्तता आज अभिवाचनाच्या रंगमंचीय नाट्याविष्कारातून रसिकांनी अनुभवली.
निमित्त होते, स्वातंत्र्य वीर सावरकर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित 'पहिल्या हिंदुहृदयसंम्राटाची झुंजार कहाणी....! माझी जन्मठेप' या आगळ्या वेगळ्या नाटकाचे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे, ग्राहकपेठचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, भाजप पुणे शहर युवा मोर्चाचे सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, स्वातंत्र्य वीर सावरकर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीतम थोरवे, श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवडचे अध्यक्ष डॉ. अविनाश वैद्य, स्व.दत्तोपंत म्हसकर सार्व.विश्वस्त संस्थेचे सचिव मिलिंद कुलकर्णी, अध्यक्ष प्रदीप पवार, भाजपचे आशुतोष वैशंपायन, योगेश राजापूरकर, सचिव मेघश्याम देशपांडे, प्राची देशपांडे (विश्वस्त), वृषाली देशपांडे (विश्वस्त) आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वतः स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या आणि अनंत वसंत पणशीकर यांची संकल्पना असलेल्या 'पहिल्या हिंदुहृदयसंम्राटाची झुंजार कहाणी....! माझी जन्मठेप' या नाटकाची निर्मिती नाट्यसंपदा कला मंच ने केली आहे. या नाटकाचा प्रयोग नुकताच रामकृष्ण मोरे थिएटर, चिंचवड़ व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे पार पडला. स्वातंत्र्य वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व श्री शंकर महाराज सेवा मंडळ,चिंचवड यांचे सहकार्य या नाटकाला लाभले आहे.