पुणे: प्रसिद्ध किर्तनकार आणि सोशल मीडियावर सतत सक्रीय असणारे चैतन्य सयाजी वाडेकर सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. चाकण एमआयडीसी परिसरात एका बिल्डरने त्यांच्या जागेतून खासगी रस्ता काढला. त्यानंतर त्याजागी संबंधित बिल्डरने कंपाऊंट काढला. यानंतर वाडेकर आणि संबंधित बिल्डरसोबत वाद झाला. हे प्रकरण न्यायालयात असतांनाच चैतन्य महाराज यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. अशा बातम्या सध्या समाजमाध्यमांवर फिरू लागल्या आहेत. मात्र चैतन्य महाराज यांच्याशी संपर्क साधला असता. ते सध्या घरी असून माझ्याविरोधात कटकारस्थान रचलं जात आहेत. याचा भांडाभोड लवकरच करणार ? असा इशाराच आता चैतन्य महाराज यांनी दिला आहे. यासंदर्भात उद्या ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
चैतन्य महाराज म्हणाले की, काल दुपारपासून प्रसार माध्यमांवर अनेक वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीच्या बातम्या माझ्या नावाने प्रसारित झाल्या आहेत. संत साहित्यचा अभ्यासक या नात्याने माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी महाराष्ट्रातील अनेकांनी मला काळजीपोटी फोन केलेत. माझ्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित जागेमध्ये अतिशय दबावतंत्र वापरून एका भांडवलदार बिल्डरानं जागा अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोणत्याही प्रकारची सविस्तर खातर जमा न करता एक चुकीचा निर्णय सेट करण्याच्या दिशेने बदनामी करण्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या. त्या निराशाजनक होत्या. उद्या पत्रकार परिषदेमधून संपुर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि कागदोपत्रे पुरावे दिले जातील. यासाठी उद्या सर्व पत्रकार बंधूंनी यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
चाकण एमआयडीसी परिसरात चैतन्य महाराज यांच्या खासगी जागेतून एका बिल्डरने माझी जागा हडपली असून त्या जागेतून खासगी रस्ता आणि कंपाऊंड टाकले असा आरोप चैतन्य महाराज यांनी केला होता. यानंतर चैतन्य महाराज यांनी याबाबत आवाज उठवत ते कंपाऊंट जेसीबीच्या साहाय्याने उद्धवस्त केला. यानंतर संबंधित बिल्डरने पोलिसांत तक्रार दिली. यात चैतन्य महाराज यांच्याविरोधात तक्रार दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अशा बातम्या समाज माध्यमात येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, याबाबत चैतन्य महाराज यांच्याशी संपर्क साधला असता, मला कोणतीही अटक करण्यात आलेली नाही. मी सध्या घरीच आहे. परंतु सध्या समाजमाध्यमांत चुकीच्या बातम्या फिरत आहेत. पत्रकारांनी देखील यासंदर्भात मला न विचारता बातम्या लावल्या. याबाबत उद्या पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकरण माध्यमांसमोर आणणार आहे. असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे चैतन्य महाराज यांना नेमकं कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.