खडकवासल्यात राजकीय ट्विस्ट: अजित पवार गटाच्या उमेदवारीने महायुतीत नवा वाद?

khadkwasala-vidhansabha-dattatray-dhankwade-and-bjp-mla-bhimrao-tapkir


पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. विद्यमान भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्याविरुद्ध पक्षांतर्गत नाराजी वाढत असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



धनकवडे यांनी थेट अजित पवार यांना पत्र देत, खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा, अशी मागणी केली आहे. "मी मागील विधानसभा निवडणुकीतही इच्छुक होतो. यावेळेस देखील खडकवासल्यातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे आणि त्यासाठी तयारी करत आहे," असे धनकवडे यांनी सांगितले.


दरम्यान, भाजपमध्येही खडकवासल्यातून उमेदवार बदलावा, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून जोर धरू लागली आहे. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्याविरोधात भाजपमध्येच असंतोष आहे, त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे धनकवडे यांनी नमूद केले आहे.



महायुतीतील जागावाटपाच्या चर्चाही अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, विशेषतः वडगाव शेरी आणि खडकवासला या मतदारसंघांच्या अदलाबदलीची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडगाव शेरीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे. यामुळे खडकवासल्यातील राजकीय तणाव वाढत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.