भोसरीमध्ये महाविकास आघाडीच्या अफवांचा फुगा अखेर फुटला! शरद पवार यांच्या सभेतील संभाव्य प्रवेशाच्या अफवा हवेत विरल्या

Bhosari-Vidhansabha-Matdarsangh-Sharad-Pawar-and-Ajit-gavane


 संभाव्य १५ ते २० नेत्यांचा दावा, प्रत्यक्षात केलेल्या प्रवेशांचे पुन्हा प्रवेश? 


पिंपरी-चिंचवड: ( विशेष  प्रतिनिधी) भोसरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातील १५ ते २० माजी नगरसेवक आणि मातब्बर नेते महाविकास आघाडीने गळाला लावले आहेत. भोसरीत होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेत त्यांचे जाहीर प्रवेश होणार आणि महायुती किंबहुना आमदार महेश लांडगे यांना ‘जोर का झटका’ बसणार आणि पवार साहेब वातावरण बदलणार… अशी चर्चा गेल्या १५ दिवसांपासून जोर धरु लागली होती. आज भोसरीत पवार साहेबांची जाहीर सभा झाली. या सभेत एकदा झालेले प्रवेश पुन्हा करुन घेत महाविकास आघाडीला कशीबशी वेळ मारुन न्यावी लागली. 


महाविकास आघाडीकडून भोसरीमध्ये अजित गव्हाणे निवडणूक लढवत आहेत. शांत-संयमी आणि सुसंस्कृत असलेल्या गव्हाणे यांच्यासोबत भाजपातील सर्व नाराज आहेत. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचा बालेकिल्ला कधीही ढासळू शकतो, असा दावा शहरातील राजकीय जाणकार आणि ज्येष्ठ पत्रकार करीत होते. अगदी लोकसभा निवडणुकीपासून हा ‘ट्रेंड’ शहरातील प्रसारमाध्यमांमध्ये कायम होता. त्याचा उद्रेक शरद पवार यांच्या सभेत होईल. त्यामुळे भाजपा आणि महेश लांडगे समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे, असा व्होरा केला जात होता.  


विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. २० नाेव्हेंबर रोजी होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जनक आणि देशाचे नेते शरद पवार यांची भोसरीत होणारी सभा निर्णायक आणि वादळी होईल. या सभेमध्ये मोठे गौप्यस्फोट होणार आहेत, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात घडवून आणण्यात आली. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून शरद पवार साहेबांच्या सभेची ‘क्युरिआसिटी’ प्रचंड वाढलेली होती. 


अजित गव्हाणेंच्या हाती फारसे गवसले नाही… 

भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर प्रचंड गर्दी जमवून अजित गव्हाणे शक्तीप्रदर्शन करण्यात यशस्वी झाले. पण, भाजपाला खिंडार पाडण्याबाबत त्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही. प्रवेश करणाऱ्यांच्या यादीमध्ये माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे,  माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, शहर सुधारणा समितीचे माजी सभापती सागर गवळी यांच्यासह १० ते १५ जणांची यादी आहे, अशी हवा होती. मात्र, प्रत्यक्षात माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते, बाळासाहेब गव्हाणे यांचा प्रवेश झाला. विशेष म्हणजे, माजी नगरसेविका भिमाबाई फुगे आणि सारिका लांडगे यांचा प्रवेश झालेला असताना पुन्हा प्रवेशाची ‘फॉरमॅलिटी’ करण्यात आली. 


महाविकास आघाडीचा भ्रमनिरास… 

माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी गावजत्रा मैदानावर सभेचे नियोजन करताना आलेल्या अडचणींबाबत शरद पवार यांच्यासमोर जाहीरपणे भाष्य केले. सभा भोसरीत होवू नये. या करिता विरोधकांनी चार दिवस आडकाठी केल्याचे त्यांनी साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. धाक-दडपशाही करुन आमदार महेश लांडगेंनी भ्रष्टाचार केला, असा आरोपही लांडे यांनी जाहीरपणे केला. या मुद्याला धरून शरद पवार लांडगेंवर बोलतील आणि भोसरीतील वातावरण फिरेल, असा दावा केला जात होता. मात्र, शरद पवार यांनी आमदार महेश लांडगे यांचा उल्लेखही केला नाही. शरद पवार यांनी त्यांच्या नेतृत्त्वाला साजेसे भाषण केले. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी म्हणून भाजपाला ‘लक्ष्य’ केले. त्यामुळे ‘‘साहेबांच्या सभेने वातावरण फिरणार..’’ या आशेवर असलेल्या महाविकास आघाडीचा पुरता भ्रमनिरास झाला. साहेबांची सभा वादळी होणार… अशी उत्सुकता होती. मात्र, राष्ट्रीय नेता स्थानिक मुद्यांवर फारसे लक्ष घालत नाही आणि तसेच झाले. मावळात सुनील शेळके यांच्यावर ज्याप्रमाणे शरद पवार यांनी खडेबोल सुनावले, तसे भोसरीत होईल, असा दावा केला जात होता. मात्र, तसे झाले नाही. 


काँग्रेस- शिवसेना ठाकरे गटाची सल कायम… 

 काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम भाषणाला उभे राहीले, असता त्यांना थांबवण्यात आले. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली, दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहीर यांनी ‘‘शहरातील तीनपैकी एकतरी जागा आम्हाला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मिळाली नाही. तरीही आम्ही खांद्याला खांदा लावून काम करु’’ असे भाष्य केले आणि शिवसैनिकांच्या मनातील सल बोलून दाखवली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुलभा उबाळे, रवि लांडगे व्यासपीठावर एकत्रित आले असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झालेले नाही, ही बाब अधोरेखित होते आहे. किंबहुना, शरद पवार यांच्यासभेत अजित गव्हाणे यांना मानणारा मोठा वर्ग सहभागी झाला. मात्र, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मानणारा सामान्य कार्यकर्त्यांचा टक्का तुलनेत अल्प होता, ही वस्तुस्थिती आहे. 


अजित गव्हाणे यांचे राजकीय ‘मिस गाईड’… ?

सुशिक्षीत आणि अभ्यासू अशी ओळख असलेल्या अजित गव्हाणे यांचा ‘पॉलिटकल ट्रॅक’ चुकला आहे. प्रसारमाध्यम आणि राजकारणातील स्वयंघोषित ‘चाणक्य’ त्यांना अक्षरश: ‘मिसगाईड’ करीत आहेत. अजित गव्हाणे यांची क्षमता असतानाही, ही निवडणूक शरद पवार यांच्या सभेवर अवलंबून ठेवण्यात आली, तसे चित्र निर्माण करण्यात आले. प्रचंड क्युरॅसिटी वाढवल्यामुळे साहेबांच्या सभेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, काहीही हाती गवसले नाही. किंबहुना, २० येणार.. २५ जण येणार.. भाजपा फुटणार… असा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात गव्हाणे यांच्यासोबत जे गेले. एक-दोन अपवाद वगळता. त्यांचा प्रभाव नाही. दुसरीकडे, संतपीठ, अर्बन स्ट्रिट आणि आंद्रा, भामा आसखेड अशा मुद्यांवर गव्हाणे यांना आरोप करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात गव्हाणे यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. एखादा कागद घेवून बोलता आलेले नाही. मतदानाला आता अवघे पाच दिवस राहीले आहेत. संतपीठावरुन चिखलीमध्ये टाळकरी आणि वारकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. आमदार महेश लांडगे यांनी दिघीच्या सभेत सैनिक भवन आणि चऱ्होलीत संतसृष्टीवरुन माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांना ‘टार्गेट’ केले. त्याला अजित गव्हाणे यांना अद्याप समर्पक प्रत्त्यूत्तर देता आले नाही. ‘‘केवळ निवडणूक हातातून गेली.. म्हणून आमदार महेश लांडगे ‘व्हायबल’ झाले आहेत. त्यामुळेच दिघीतील सभेत त्यांच्या रागाचा पारा चढला…’’ असा ‘ फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्यात धन्यता मानली जात आहे. याचा सरळ अर्थ अजित गव्हाणे यांना ‘पॉलिटिकल मिसगाईड’ केले जात आहे. गव्हाणे या ‘ट्रॅप’मध्ये अडकले आहेत. गव्हाणे यांच्याकडे ‘व्हीजन’ आहे. त्यावर त्यांना प्रभावशाली बोलताही येते. दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत त्यांचे कौतूक केले. कारण, ‘‘मी काय करणार…’’ हे त्यांनी सांगितले. आता साहेबांच्या सभेत गव्हाणे नवीन काहीतरी लोकांसमोर मांडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. गव्हाणे यांना पुन्हा त्याच- त्या प्रश्नांवर बोलावे लागले. त्यामुळे त्यांच्या यंत्रणेकडून सक्षमपणे ‘इनपूट’ दिले जात नाहीत, हे स्पष्ट होते. परिणामी, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील एक सुसंस्कृत नेता अजित गव्हाणे केवळ चुकीच्या मार्गदर्शनामुळे अपयशाच्या उंबरठ्यावर आहे. महेश लांडगे यांना पराभूत करणे इतके सहज सोपे नाही, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.