बारामती (प्रतिनिधी) : बारामतीची प्रसन्न गुलाबी थंडीने सजलेली पहाट, हिरवाई नटलेले सुंदर रस्ते , एसआरपीएफ च्या शिस्तबद्ध बँड पथकाने रनर्सचे फिनिश पॉईंटवर केलेले अविस्मरणीय स्वागत आणि बारामतीचा विकास पॅटर्न न्याहाळत रनर्सने विक्रमी वेळेत साधलेली दौड यांमुळे पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत बारामती पॉवर मॅरेथॉनचा दुसरा सिझन संस्मरणीय ठरला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, युवा उद्योजक आणि पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन, जान्हवी पुनीत बालन-धारिवाल, युवा नेते पार्थ पवार, अभिनेता जॅकी भगनानी यांनी पहाटे चार वाजता झेंडा दाखवून या मेरोथॉन स्पर्धेचा शुभारंभ केला. वर्ल्ड ऍथलेटिक असोसिएशनची मान्यतेने आणि तालुका स्तरावर आंतरराष्ट्रीय मानकांच्या दृष्टीने संपन्न होणारी बारामती पॉवर मॅरेथॉन ही कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅरॅथॉनसाठी पात्रता निकष गणली जाते. त्यामुळे देशभरातून अनेक ख्यातनाम रनर्स या मॅरेथॉन मध्ये सहभागी होत असतात. सलग दुसऱ्या वर्षी पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उत्कृष्ट नियोजन , ट्रॅक वर असणारी हायड्रेशनची आणि एनर्जी पॉईंटची उत्तम व्यवस्था , मैदानावर जागोजागी उभारलेले सेल्फी पॉईंट आणि फोटोसेशन बूथ , चिंकाराच्या ब्रँडिंगने साधलेले वातावरण यांमुळे प्रोफेशनल रनर्ससोबतच यंदा बारामती आणि परिसरातील आरोग्यस्पर्धकांची संख्या वाढलेली बघायला मिळाली. एकूण २८०० हुन अधिक रनर्स मॅरेथॉन मध्ये विविध रनिंग कॅटेगरीसाठी सहभागी झाले होते. बारामती रेल्वे स्टेशन ग्राउंड येथे विविध पाच गटांमध्ये ही मॅरेथॉन पार पडली. खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी त्यांनी मॅरेथॉन आणि त्याचे आयोजन करणे हे निश्चितच आव्हानात्मक काम आहे. बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्यांनी हे आव्हान लीलया पेलले असल्याचे सांगितले. तर बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक - अध्यक्ष सतिश ननवरे म्हणाले , "पहिल्या पर्वाच्या यशानंतर दुसऱ्या पर्वाला रनर्सने दिलेला प्रतिसाद आम्हा सर्व आयोजकांचा उत्साह वाढविणारा आहे. मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी ज्यांचे पाठबळ लाभलेल्या युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह सर्वच प्रमुख प्रायोजकांचे आभार व्यक्त केले.
अजित पवारांकडून पुनीत बालन यांचे कौतुक स्पर्धकांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , "बारामतीची प्रगती चहुबाजूंनी होत असताना, त्याला क्रीडा क्षेत्र देखील अपवाद नाही. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी मॅरेथॉन सारख्या स्पर्धा महत्वाच्या ठरतात आणि या प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनात पुनीत बालन आणि त्यांच्या सौभाग्यवती जान्हवी या नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी रित्या सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. सतिश ननवरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेऊन ही मॅरेथॉन यशस्वी केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून विविध खेळाना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करत आहोत. बारामती पॉवर मॅरोथॉन स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि निटनेटके असे होते. या स्पर्धेत हजारो नागरिक-तरुण भल्या पहाटे उपस्थित राहून सहभागी झाले. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला आहे.- पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.
मॅरोथॉन स्पर्धेतील विजेते
ही मॅरोथॉन तीन गटात झाली. ४५ किमी, २१ किमी, १० किमी, या रनिंग कॅटेगरी मधील , प्रथम तीन विजेते आणि मॅरेथॉन मध्ये सहभागी टॉप ५ क्लब्स आणि स्कुल रन मध्ये जास्तीत जास्त संख्येने स्पर्धक देणाऱ्या टॉप ०३ स्कुलला सुद्धा रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये ४२ किमी पुरुष (प्रथम -लते चांदेव , द्वितीय - गायकवाड दयाराम , तृतीय - पंकज सिंग ) ४२ किमी स्त्री (प्रथम -मनीषा जोशी , द्वितीय - उर्मिला बने , तृतीय - सिंधू उमेश) २१ किमी पुरुष (प्रथम -धोंडिबा गिरदवा , द्वितीय - आबासाहेब राऊत , तृतीय -डॉ.मयूर फरांदे ) २१ किमी स्त्री (प्रथम -शीतल तांबे , द्वितीय - शिवानी चौरसिया , तृतीय - स्मिता शिंदे ) १० किमी पुरुष (प्रथम -अमूल अमुने , द्वितीय -सुजल सावंत , तृतीय - आर्यन पवार ) १० किमी स्त्री (प्रथम -आरती बाबर , द्वितीय - सोनाली मटने , तृतीय -रोशनी निषाद )
आणि टॉप ५ क्लब्स प्रथम - फलटण रनर्स , द्वितीय - सनराईज सायकल ग्रुप , तृतीय - एन्व्हायरमेंटल हेल्थ क्लब , चतुर्थ - बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन , पाचवा क्रमांक -सासवड रनर्स या क्लबला तसेच , टॉप ०३ स्कूल प्रथम - एस.व्ही.पी.एम. शारदानगर , द्वितीय - विनोद कुमार गुजर विद्याप्रतिष्ठान स्कूल , तृतीय -कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन स्कूल यांना गौरविण्यात आले.