पुणे: जे. एस. पी. एम. व टी. एस. एस. एम. ग्रुपच्या भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयात २७ व २८ डिसेंबर रोजी आयोजित शोध २०२४ राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात तब्बल ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि १०० उत्कृष्ट विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. पुणे शहरातील विविध शाळांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील कौशल्याला वाव दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. व्ही. एम. कोल्हे, उपसचिव, आर. बी. टी. ई., पुणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त मा. श्री. ऋषीराज सावंत सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याशिवाय संकुल संचालक डॉ. एस. आर. थिटे यांचीही उपस्थिती होती. संस्थेच्या प्राचार्या डॉ. ए. एस. पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करत विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. एम. एम. देशमुख, प्राचार्य, नऱ्हे टेक्निकल कॅम्पस, आणि डॉ. जी. ए. हिंगे, प्राचार्य, भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, यांनी विज्ञान प्रयोगातून संशोधनाची गरज आणि जागतिक विज्ञानातील भारताच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण विचार मांडण्याचे आवाहन केले.
या प्रदर्शनाला श्री. विकास जाधव, संकुल समन्वयक, आणि डॉ. अजिता परबत, प्राचार्या, सिग्नेट पब्लिक स्कूल, यांची उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक करत त्यांना विज्ञान विषयक सखोल ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सी. ए. शेटगार यांनी आभार व्यक्त केले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान प्रकल्प हे त्यांच्या सृजनशीलतेचे उत्तम उदाहरण होते. त्यांनी विविध विषयांवरील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करून विज्ञान शिक्षणातील महत्त्व पटवून दिले. शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेत त्यांच्या विज्ञानविषयक कल्पनांना मूर्त रूप देण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘शोध २०२४’ प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देत विज्ञान क्षेत्रात नव्या संशोधनाची बीजे रोवली. आयोजकांनी या उपक्रमाद्वारे तरुण पिढीला विज्ञानातील योगदानासाठी प्रेरित केले. हा कार्यक्रम भविष्यातील संशोधकांसाठी नवा आदर्श ठरेल.