सांगावी: सध्या सर्व ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. रहदारी नसेल शांतता असेल तेव्हा भटके कुत्रे अचानक एखाद्या व्यक्तीवर हल्ला करतात. यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला जात आहे. अशीच एक भयंकर घटना सांगावी मध्ये मेन रोडला घटना घडली आहे.या भयानक घटनेची माहिती मिळताच सांगवी रहाटणी मंडलचे भाजपा उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत मोकाट फिरणाऱ्या कुत्रांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. तसेच जर मोकाट कुत्रांचा बंदोबस्त नाही झाला तर परिसरातील मोकाट कुत्र्यांना पशुवैद्यकीय कार्यालयात तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगावर सोडण्याचा इशारा दिला आहे.
सांगवीमध्ये नेहमीप्रमाणे ही महिला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आली होती. ती वॉक करत असताना २ ते ३ कुत्रे आधी तिच्याजवळ आले. त्यानंतर बघता बघता अचानक ८ कुत्र्यांनी या महिलेला घेरलं. सुरवातीला कुत्रे तिच्यावर भुंकू लागले आणि तिला चावण्याचा प्रयत्न करू लागले. सकाळची वेळ असल्याने बाहेर कोणीही नव्हते. आपला जीव वाचवण्यासाठी महिला जोरजोरात ओरडू लागली, किंचाळू लागली, मात्र तिचा आवाज लगेचच कुणापर्यंत पोहचला नाही. या परिस्थितीत महिलेने हार मानली नाही. तिने हाताने आणि आजुबाजूला असलेल्या वस्तूंचा वापर करत कुत्र्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रे काही तेथून जात नव्हते. शेवटी काही कुत्रे तिला चावण्यासाठी पुढे येऊ लागले. त्यानंतर ही महिला पुढे चालू लागली तेव्हा ती पाय घसरून पडली आणि मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर भयानक हल्ला चढवला, सुदैवाने हि महिला यातून वाचली.
सांगावी परिसरातील रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण झालेला धोका हा केवळ एक प्रशासकीय समस्या नाही, तर एक सामाजिक आपत्ती आहे. या समस्येचा वेळीच निपटारा केला नाही, तर त्याचे परिणाम फार गंभीर असतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तत्काळ कृती करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. अन्यथा परिसरातील सर्व श्वान प्राणी आपल्या पशुवैद्यकीय कार्यालयात तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगावर सोडण्यात येतील. ललित म्हसेकर, उपाध्यक्ष , भाजप, सांगावी रहाटणी मंडल