पुणे, १२ एप्रिल — महाराष्ट्रातील सिंहगड किल्ल्यावर नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामुळे राज्याच्या संस्कृतीवर आणि पर्यटकांसोबतच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. न्यूझीलंडहून भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका परदेशी तरुणाला काही स्थानिक तरुणांनी विनाकारण अश्लील मराठी शिव्यांचे उच्चार शिकवून त्याची चेष्टा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या कृत्यामुळे मराठी अस्मिता आणि पाहुणचाराच्या संस्कृतीला मोठा धक्का बसला आहे. या पूर्ण घटनेचा विडिओ Lukethexplorer या युट्युब चॅनेलवर अपलोड केलेला आहे.
नेमकं काय घडलं?
न्यूझीलंडचा हा पर्यटक पुण्याजवळील प्रसिद्ध सिंहगड किल्ला पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी किल्ल्यावर फिरत असताना काही तरुण त्याच्या संपर्कात आले. त्याला मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचा फायदा घेत, या तरुणांनी "मराठी शिकवतो" या कारणाने त्याला काही अश्लील आणि अपमानास्पद शिव्या शिकवल्या.
त्याला सांगण्यात आलं की, "ही वाक्यं इथे बोलायची" – आणि तोही समोर आलेल्या अन्य पर्यटकांकडे पाहून त्याच शिव्या वापरू लागला. समोरचे तरुण ते ऐकून हसले, अजून शिव्या शिकवल्या, आणि पुन्हा त्याला ते इतरांकडे वापरण्यास सांगितलं. थोड्या वेळाने या परदेशी तरुणाला हे काहीतरी चुकीचं शिकवलं जात असल्याचं लक्षात आलं आणि तो तेथून निघून गेला.
समाजमाध्यमांवर संतापाचा उद्रेक
ही संपूर्ण घटना एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली असून, सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "सिंहगड हा शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला पवित्र किल्ला आहे. तिथे येणाऱ्या पाहुण्यांशी असं वागणं ही आपल्या संस्कृतीला लाज वाटावी अशी गोष्ट आहे," अशा प्रकारची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
पर्यटन, पाहुणचार आणि जबाबदारी
महाराष्ट्रात दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक येतात. किल्ले, मंदिरे, ऐतिहासिक स्थळं आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे महाराष्ट्र पर्यटनासाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. मात्र, अशा घटनांमुळे पर्यटकांचा अनुभव खराब होतो आणि राज्याची प्रतिमा मलिन होते.
माझी महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे
— दत्ता चौधरी (@DattaChoud73764) April 11, 2025
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहगड किल्ल्यावर आलेल्या परदेशी पर्यटकांसोबत टवाळखोर अवलादीच्या लोकांनी जे कृत्य केले आहे त्याचा या लोकांना असा धडा शिकवा की यांना यांचे बापच नाही यांचे आजोबा पंजोबा आठवले पाहिजेत
😡😡😡@CMOMaharashtra pic.twitter.com/vjHzk8Tt0w
"अतिथी देवो भव" हा आपल्या संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. परंतु, काही अतिरेक्यांच्या मूर्खपणामुळे त्यावर पाणी फेरलं जातं. यामुळे भविष्यात पर्यटकांची संख्या कमी होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाची भूमिका आणि मागणी
या घटनेतील तरुण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित तरुणांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजमाध्यमांवरून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनेही या प्रकाराची चौकशी सुरू केल्याचं समजतं.