पुणे: पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाबा भिडे पुलावरून ये-जा करणाऱ्या हजारो पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि अडचणीत आणणारी बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळ पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने भिडे पूल पुढील दीड महिना वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या निर्णयामुळे शहरातल्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
कोणत्या भागांवर होणार परिणाम?
भिडे पूल हा मुठा नदीवर वसलेला, पुण्याच्या नारायण पेठ, सदाशिव पेठ, फर्ग्युसन रोड, जे.एम. रोड अशा भागांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. बाबा भिडे पूल हा पुण्यातील मध्यवर्ती भागातील मुठा नदीवर वसलेला आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. नारायण पेठ, सदाशिव पेठ असे शहरातील प्रमुख भाग तसेच जे एम आणि एफसी रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. दुसऱ्या बाजूला उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परंतु आता हा भिडे पूल बंद केल्यामुळे नदीपात्रातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. मेट्रोच्या कामामुळे आपण दीड महिना बंद राहत असल्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून क्षमस्व अशी पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे. पण रहदारीचा हा संपूर्ण भाग असल्यामुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेवर इथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. या पुलावरून दररोज हजारो गाड्या आणि दुचाकी वाहने प्रवास करतात. पूल बंद असल्याने संपूर्ण वाहतूक आता संगमेश्वर पुल, लक्ष्मी रस्त्यावरील पुल, किंवा छत्रपती शिवाजी पूल (नवा पूल) या मार्गांकडे वळवावी लागणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता असून, पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेपुढे मोठं आव्हान उभं राहणार आहे.
पूर्वसूचना न देता निर्णय; नागरिकांची गैरसोय
भिडे पूल अचानक बंद केल्यामुळे अनेक नागरिक गोंधळात सापडले. अनेकजण अर्ध्या रस्त्यावरून माघारी फिरताना दिसले. पूर्वसूचना न दिल्याने शाळकरी मुले, वृद्ध आणि रुग्णवाहिका यांना देखील अडथळा जाणवतो आहे. मेट्रो प्रशासनाने पुलाजवळ "काम सुरू असल्यामुळे पुलावरून वाहतूक बंद, आम्ही क्षमस्व" असा फलक लावलेला आहे. मात्र नागरिकांचा आक्रोश असा आहे की, “माफीनाम्यापेक्षा आधीच योजना आखून पर्यायी मार्गांची माहिती दिली असती तर गैरसोय टळली असती.”