पुणे : प्रतिनिधी पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या 'लहू बालवडकर सोशल वेलफेर' आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त माध्यमातून Pharmathon 2.0 ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा काल पार पडली. यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व फॉर्मसी कॉलेज, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल, केमिस्ट असोसिएशन, ड्रग इन्स्पेक्टर व FDA यांचा मोठा सहभाग राहिला. यावेळी तब्बल 6000 हून अधिक धावपटूंनी या आरोग्य चळवळीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
६ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर पार पडणाऱ्या ‘फार्माथॉन’ या आरोग्यप्रद जागरूकतेसाठीच्या मॅरेथॉनसाठी महाराष्ट्रातील फार्मासिस्ट, औषध उत्पादक आणि ८५ फार्मा कॉलेजेस यांचा सहभाग ही एक विलक्षण गोष्ट आहे. आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी आरोग्य क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे महान कार्य भाजपचे नेते, पुणे शहर चिटणीस लहु बालवडकर यांनी केले आहे.
औषध व्यवसायातील नवकल्पनांना चालना देण्यासाठी आणि फार्मा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून या भव्य मॅरेथॉन स्पर्धेकडे पाहिले जात आहे. या स्पर्धेमध्ये 3 किमी, 5 किमी, 10 किमी आणि 21 किमी अशा विविध गटांमध्ये ही धावण्याची स्पर्धा पार पडली. ही मॅरेथॉन स्पर्धा IPA Pharmathon टीमच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यामध्ये डॉ. सत्यनारायण (चेअरमन), डॉ. रविंद्र कांबळे (व्हाईस चेअरमन), प्रा. प्रविण जावळे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), आणि सागर पायगुडे (जॉईंट सेक्रेटरी) यांनी संयोजनाची धुरा सांभाळली. IPA पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बोबडे आणि खजिनदार डॉ. मारुती शेलार यांनी देखील मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. संजय चोरडिया (चेअरमन, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट), डॉ. सोहन चितलांगे (प्रभारी कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ), मा. बापू बांगर (उपायुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय), मा. गिरीश हुकारे (सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन), डॉ. राकेश सोमानी (अध्यक्ष, APTI महाराष्ट्र), मा. सचिन कांबळे (FDA नवी मुंबई) आणि आतिश सरकाळे ( सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, गोंदिया) यांचा समावेश होता.
मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर आणि पर्ण पेठे या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले. या सेलिब्रिटींनी उपस्थित राहून धावपट्टूंना प्रोत्साहन दिले आणि कार्यक्रमात रंगत आणली. Pharmathon 2.0 ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा न राहता, फार्मा समुदायाच्या माध्यमातून आरोग्य आणि व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक प्रेरणादायी सामाजिक चळवळ ठरली.