पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने विशेष द्राक्षांची आरास करून दर्शनासाठी सजवण्यात आले होते. या अनोख्या सजावटीने बाप्पाचं रूप अधिकच खुलून आलं असून, पुणेकर भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात हजेरी लावली.
संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपतीच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. याच निमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट तर्फे मंदिरात बाप्पाला निळ्या आणि काळ्या रंगांच्या ताज्या द्राक्षांची सुंदर आरास करण्यात आली. या द्राक्षांचा नैवेद्य अर्पण करून आरास तयार करण्यात आली होती. विविध आकारांची आणि रंगांची द्राक्षं एकत्र करून तयार केलेली आरास पाहताना भाविक थक्क झाले.
या अनोख्या सजावटीमुळे मंदिरात उत्सवाचे आणि आध्यात्मिकतेचे वातावरण तयार झाले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ टिपून हा क्षण आपल्या आठवणीत जतन केला. विशेष म्हणजे या आरासासाठी वापरलेली सर्व द्राक्षं पुण्यातील ‘सुर्योदय फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेला वाटप करण्यात आली. या संस्थेमार्फत ही फळं गरजूंपर्यंत पोहोचवली जाणार आहेत.
ट्रस्टच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. पर्यावरण संरक्षण, अन्नदान, आरोग्य तपासणी शिबिरे यासारख्या कार्यात ट्रस्टचा पुढाकार असतो. संकष्टीच्या निमित्ताने केलेली ही सामाजिक जाणिव असलेली सजावट याचे उत्तम उदाहरण ठरली.
भाविकांच्या गर्दीतून बाप्पाच्या दर्शनासाठी झालेलं हे आगळंवेगळं आयोजन यशस्वी ठरलं असून, सर्व स्तरातून ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.