पुणे – नांदेड सिटीमधील मधुवंती सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणाला सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी संध्याकाळी घडली असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पती व दोन मुलांसह गेल्या १० वर्षांपासून मधुवंती सोसायटीमध्ये राहत आहेत. त्यांच्या पतींचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता त्यांच्या पतींनी सोसायटीत प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीवर स्टिकर नसल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना गेटवरच अडवून ठेवले.
या वादाचे गांभीर्य वाढल्यावर फिर्यादी महिला आपल्या मुलासह गेटवर पोहोचल्या व सोसायटीचे रेसीडेन्स कार्ड दाखवले. त्यानंतरही सुरक्षा रक्षकांनी अरेरावी करत वाद घातला. वाद वाढल्यानंतर फिर्यादींचा तरुण मुलगा हस्तक्षेप करण्यासाठी पुढे गेला. याच दरम्यान ८ ते १० सुरक्षा रक्षकांनी एकत्र येत त्या तरुणावर हल्ला चढवला व त्याला बेदम मारहाण केली.
मारहाणीनंतर पीडित कुटुंबीयांनी नजीकच्या नांदेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची तक्रार नोंदवली. यावरून पोलीसांनी नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी व अश्विनी नावाच्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकारामुळे संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रहिवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी संबंधित सुरक्षारक्षकांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
सुरक्षारक्षकच झाले भक्षक
सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सुरक्षरक्षकांची नेमणूक केली जाते. नागरिकांना ये जा करताना काही अडचण येऊ नये. अथवा बाहेरून येणाऱ्या लोकांच्या चौकशीसाठी हे सुरक्षारक्षक तैनात असतात. परंतु त्यांच्याकडूनच नागरिकांना मारहाण होत असल्याने सुरक्षारक्षकच भक्षक झाल्याची चर्चा सोयायटीत होऊ लागली आहे. जवळपास ८ ते १० सुरक्षारक्षकांडून एका तरुणाला मारहाण करणे हे अत्यंत चुकीचं असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.